देवलापार : आईने अभ्यास व घरकाम करण्यासाठी रागावल्याने मनात राग धरून अल्पवयीन विद्यार्थिनीने घरी छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू ताेतलाडाेह (रयतवाडी) येथे शुक्रवारी (दि. १२) दुपारी घडली.
संजना वसंता घसाळ (१५, रा. न्यू ताेतलाडाेह, रयतवाडी, ता. रामटेक) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती देवलापार येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकायची. अभ्यास व घरकाम करण्यासाठी आई तिच्यावर रागावली हाेती. त्यामुळे तिला राग आला हाेता. आई व लहान बहीण घराबाहेर जाताच तिने छताला दाेरीच्या मदतीने गळफास लावून घेतला. काही वेळाने दाेघीही घरी परतल्यावर त्यांना संजना लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यामुळे त्यांनी तिला लगेच देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घाेषित केले. शिवाय, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविला. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास ठाणेदार प्रवीण बाेरकुटे करीत आहेत.