लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसत आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. या इंजेक्शनसह रुग्णालयातील बेड आणि लसीच्या उपलब्धतेसंदर्भात सर्व शासकीय -अशासकीय यंत्रणांनी आपसात अधिक समन्वय करून प्रभावी व्यवस्थापन करावे, असे आदेश पालकमंत्री नितीन राऊत यांनी येथे दिले.
शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी नागपुरातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी तर शहरासाठी महानगरपालिका आयुक्त यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मागणी व पुरवठ्यावर नियंत्रण ठेवून गरजूंना ते उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महामारीचे संकट असताना रेमडेसिवीर हाच एकमेव रामबाण उपाय समजून खासगी डॉक्टर त्याचा अवाजवी वापर करत आहेत. मात्र रुग्णांना केवळ गंभीर स्थितीतच योग्य प्रमाणात रेमडेसिवीरचा वापर झाला पाहीजे. रेमडेसिवीर खरेदी करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांच्या रांगा दिसून येतात. रुग्णांच्या नातेवाईकांकडून वाढीव किमती उकळण्यात आल्याचे काही ठिकाणी निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात गरजू रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांनी समन्वय ठेवावा. अन्न व औषध प्रशासन विभागानेही दक्ष राहून याबाबत आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
या बैठकीला आ. विकास ठाकरे, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, वनामती प्रशिक्षण संस्थेच्या संचालक मनीषा खत्री, महापालिकेचे अपर आयुक्त जलज शर्मा, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अजय केवलिया, माहिती व जनसंपर्क संचालक हेमराज बागुल, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेन्द्र पातुरकर तसेच पोलीस, महसूल, आरोग्य, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, महानगरपालिका आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी, टास्क फोर्सचे पदाधिकारी उपस्थित होते.
रुग्णांची वाढती संख्या ही आरोग्य यंत्रणेवर ताण वाढवत आहे. म्हणूनच संसर्ग होताच गाव परिसरातील डॉक्टरांमार्फत तालुकास्तरावरील नियंत्रण कक्षाकडे माहिती जाणे गरजेचे आहे. रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत प्रभावी बेड व्यवस्थापन करण्यात यावे, असेही निर्देश त्यांनी विभागीय आयुक्तांना दिले.
----------
- ग्रामीण भागात शांतता समितीच्या धर्तीवर तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांनी तालुकास्तरावर कार्यरत डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांच्याकडून संशयित रुग्णांची माहिती घ्यावी.
- शहरातही झोननिहाय अशाच पद्धतीची समन्वय यंत्रणा करावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
- कोरोना निर्बंधांच्या काळात लसीकरणाला जाण्यासाठी बस उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना केले. - महामारीच्या या कठीणप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नव्याने रुजू झालेल्या मात्र कर्तव्यपालनात कसूर करणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याचे त्यांनी बजावले.