लाेकमत न्यूज नेटवर्क
सावेनर : शहर व परिसरातील वाढत्या काेराेना रुग्णसंख्येचा फायदा घेत काही खासगी रुग्णालयात काेराेनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून अवास्तव बिले वसूल केली जात आहेत. काेराेनाबाधितांची हाेणारी ही आर्थिक लूट तात्काळ थांबवा, या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नितीन राठी यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन दिले आहे.
सावनेर तालुक्यातील काेराेना रुग्णांच्या उपचारासाठी शासनाने काेविड केअर सेंटर सुरू करण्याची परवानगी दिली. प्रशासनाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु काेराेना संकटकाळात खासगी काेविड सेंटरमध्ये रुग्णांकडून अवाजवी बिल आकारत त्यांची अक्षरश: लूट केली जात आहे. विशेषत: शासनाने विविध बाबींचे दर निश्चित केले हाेते. असे असतानाही शासन नियमांची पायमल्ली करीत अनेकांना अवास्तव बिल दिल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्व बिलांचे ऑडिट करून बिलाची अधिक रक्कम परत करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
काेराेनामुळे व्यवसाय ठप्प असून, ग्रामीण भागातही नागरिकांना आर्थिक समस्यांना सामाेरे जावे लागत आहे. खरीप हंगाम ताेंडावर असून शेतीची मशागत, पेरणीसाठी जुळवाजुळव करीत असतानाच शेतकऱ्यांना काेराेना संकटाला ताेंड द्यावे लागत आहे. अशा कठीण काळातही खासगी रुग्णालयात शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून अव्वाच्यासव्वा बिल आकारत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, याकडेही त्यांनी निवेदनातून लक्ष वेधले.