लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : राज्य शासनाच्या निर्देशानुसार ‘ड्राेन’द्वारे काटाेल तालुक्यातील गावठाणांच्या माेजमापास पारडसिंगा येथून सुरुवात करण्यात आली. यात तालुक्यातील १८० गावांपैकी १४० गावांचे माेजमाप करण्यात येणार असून, ३५ रिठी गावे, तीन इतर गावे आणि दाेन पुनर्वसन जंगल गावे वगळण्यात आली आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी (महसूल) श्रीकांत उंबरकर यांनी दिली.
या अभियानात ‘ड्राेन’द्वारे गावे, गावांमधील घरे, माेकळी जागा आणि गावठाणांच्या जागांचे माेजमाप केले जणार असल्याचे भूमिअभिलेख कार्यालयाचे उप अधीक्षक विजय काटवाटे यांनी स्पष्ट केले. काटाेल तालुक्यात एकूण १८० गावे आहेत. यात ३५ रिठी आणि दाेन जंगल पुनर्वसन गावांचा समावेश आहे. या माेजमापातून रिठी व जंगल पुनर्वसन गावांसाेबतच तीन इतर गावांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे ‘ड्राेन’द्वारे उर्वरित १४० गावांचे माेजमाप केले जाणार आहे.
‘ड्राेन’द्वारे माेजमाप केल्याने गावांमधील वाढती लोकसंख्या, गावांचा वाढता आकार, विकास योजना, गावांच्या परिसरातील भौगोलिक बदल यासह अन्य बाबींची माहिती घेणे सहज शक्य होणार आहे. शिवाय, जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुकर होणार असून, त्याला वेग येईल. त्यामुळे नागरिकांचे जमिनीचे वाद मिटवण्यास मदत होणार असल्याचे भूमीअभिलेख कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक संदीप भोरकर यांनी सांगितले.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार अजय चरडे, जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रशेखर कोल्हे, पंचायत समिती सभापती धम्मपाल खोब्रागडे, उपसभापती अनुराधा खराडे, खंडविकास अधिकारी विजय धापके, ठाणेदार महादेव आचरेकर, सरपंच वैशाली खरबडे, संदीप भोरकर यांच्यासह भूमीअभिलेख कार्यालयाचे कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.
...
प्राक्टिकल बेस सर्वेक्षण
काटाेल तालुक्यातील धनकुंड, रानबाेडी व मलकापूर ही तीन गावे ‘ड्राेन’ माेजमापातून वगळण्यात आली असून, या गावांचे प्राक्टिकल बेस सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अधिकार योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी जागेचा नकाशा व गावठाणाचे भूमापन असणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया जलद होण्यासाठी ‘ड्रोन’चा वापर केला जात आहे. ‘ड्रोन’द्वारे एका गावठाणाचे मोजमाप २४ मिनिटांत पूर्ण हाेत असल्याने वेळेची बचत होणार आहे. शिवाय, मोजमापात अचूकता येणार आहे. या प्रक्रियेनंतर नागरिकांना जागेची मोजणी सहज करता येणार असल्याचे भूमीअभिलेख उपअधीक्षक विजय काटवाटे यांनी सांगितले.