नागपूर : अन्न, वस्त्र, निवारा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असल्याच्या कितीही बाता मारत असलो तरी वास्तविकता हीच आहे की स्वातंत्र्याचे ७३ उन्हाळे-पावसाळे उलटून गेल्यावरही कोट्यवधी जनसंख्या उघड्यावर आहे. काहींना अन्न आहे तर वस्त्र नाही अन् वस्त्र आहे तर निवारा नाही. आभासी माध्यमांवर असमानतेच्या उद्विग्न व्यथा व्यक्त होत असल्या तरी चार भिंतीच्या आड दुलई ओढून बिनधास्त निद्रादेवीला शरण जात असणाऱ्यांना ही रिॲलिटी कळणार का, असा प्रश्न आहे.
वाढत्या गारठ्याने तापमानाचा पारा प्रचंड घसरत आहे. अन्न, वस्त्र, निवाऱ्याची व्यवस्था असणारेही कुडकुडत आहेत. अशा स्थितीत रोजगारासाठी एका अर्थाने अन्नासाठी मारामार करत शेकडो-हजारो मैल पायपीट करणाऱ्या बेघरांना वस्त्र आणि निवाऱ्याचा ठाव नाही. शहराच्या प्रमुख रस्त्यांवर हाताला असलेले काम शोधत, करत तेथेच कुणबा थाटणे हेच त्यांच्या नशिबी आहे. अशा एक दोन कुटुंबाच्या छोट्या वस्त्या दीक्षाभूमी, आयटीआय, कस्तूरचंद पार्क, महाराज बाग,यशवंत स्टेडियम, फुटाळा आणि अन्य ठिकाणी दिसून येतात. असेही नाही की त्यांची ही विवंचना कुणाच्या नजरेस पडत नाही किंवा कुणी त्यांच्या हाकेला साद देत नाही. स्वयंसेवी संस्था तत्पर आहेत. ब्लँकेट्स, चिमुकल्यांसाठी, वृद्धांसाठी स्वेटर्स पुरवले जातात. निवारा कोण पुरविणार... तर हा प्रश्न अनुत्तरित आहे. आभाळाला छप्पर मानत, जमिनीला अंथरुण म्हणत उन, वारा, पावसाच्या संगतीने आलेला दिवस पुढे ढकलत आहेत. या स्थितीने लोकशाहीचे चारही खांब कधीच हलत नाहीत, हे दुर्दैव आहे.
* रोजगाराच्या विवंचनेने निवारा सुटला
प्रत्येक राज्यात येणाऱ्या सरकारांनी मतदानापूर्वी गृहराज्य, गृहनगरातच रोजगाराची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. मात्र, ना केंद्राला ना राज्याला ना स्थानिक स्वराज्य संस्थांना आपली ही आश्वासनपूर्ती कधीच पूर्ण करता आली नाही. त्यामुळेच, आपल्या गावातील निवारा सोडून या बेरोजगारांना परमुलखात प्रयाण करावे लागते आणि निवाराविहीन जीवन कंठावे लागत आहे.
* भटकणार नाही तर कोण पुसणार
दीक्षाभूमीपुढे गाडीया लोहार समाजाचे एक कुटुंब तवा, कढई विकते. भैयालाल हा आपल्या वृद्ध व अनुभवी आत्या व मामासोबत आपले दोन भाऊ, पत्नी व एका मुलासाठी आला आहे. ऊर्वरित कुटुंब राजस्थानातील बारा जिल्ह्यातील एका गावात आहे. रोजगारासाठी दिवाळी ते होळी असा त्यांचा अर्धवट कुटुंबासोबतचा प्रवास असतो. उघड्यावरच संसार थाटला जातो. पुढे आरटीआय जवळ सुनील सोबत भाऊ, त्याची पत्नी, दोन मुले, आई असे कुटुंब जोधपूर येथून आले आहे. त्यांचेही तसेच. गोरक्षणपुढे गेल्या ३० वर्षापासून केशरभाई अहमदाबाद येथून येथेच वस्ती करून राहतात. लाकडी बॅट बनवून विकतात. अख्खे आयुष्य उघड्यावर चालले आहे. भटकणार नाही तर कोण पुसणार, असा सवाल त्यांचा आहे.
.............