नागपूर : औद्योगिक क्षेत्राला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत काही महिन्यांपासून वाढ झाल्याने एमएसएमई उत्पादनात कपात करीत आहेत. सध्या संपूर्ण देशात मालाला मागणी कमी, शिवाय पुरवठा कमी असल्याने उद्योजक चिंतेत आहेत. एमएसएमईला कच्च्या मालाची टंचाई जाणवत असल्याने जुने ऑर्डर पूर्ण करण्यात ते असमर्थ आहेत.
सध्या भारतात कच्च्या मालाच्या निर्यातीत वाढ झाल्याने किमती वाढल्या आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या किमती गेल्या दीड महिन्यापासून आकाशाला भिडल्या आहेत. त्यामुळे कच्च्या मालाची उपलब्धता कमी आहे. मुख्यत्वे, स्टील, ग्रॅन्युल्स, क्राफ्ट पेपर्स, केमिकल्स, प्लास्टि, कॉटन, आदी कच्च्या मालाची कमतरता आहे. देशस्तरावरील असोसिएशनने कच्च्या मालाच्या उपलब्धतेबाबत केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. एमएसएमई यांच्यानुसार गेल्या तीन महिन्यांपासून अॅल्युमिनियमची किंमत ७८ रुपयांवरून १३६ रुपये किलोवर गेली आहे. तसेच ३७० रुपये किलोचे पितळ ४५० रुपये, तांबे ४७० रुपयांवरून ५७० रुपये, याशिवाय विभिन्न प्रकारच्या स्टीलची किंमत ४० ते ६० टक्क्यांनी वाढली आहे.
प्रभावित होत आहे उत्पादन
कच्च्या तेलाशी जुळलेल्या प्लास्टिकच्या भावात निरंतर वाढ होत आहे. उद्योजक म्हणाले, कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने जुन्या दरावर घेतलेले ऑर्डर पूर्ण करणे कठीण होत आहे. त्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. शिवाय गुंतवणूक वाढली आहे. कच्च्या मालाची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याने घरगुती उत्पादनात त्याची टंचाई जाणवत आहे.
मागणीअभावी उत्पादनावर परिणाम
देशात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने औद्योगिक उत्पादनाला मागणी कमी झाली आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. सध्या बाजारात फिनिश गुडची मागणी कमी झाली आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या किमती दीड महिन्यापासून वाढल्या आहेत. जुने ऑर्डर पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत.
मिलिंद कानडे, उपाध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असोसिएशन.