उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
उमरेड : उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या शौचालयात सहा ते सात महिन्याचे भ्रूण (बाळ) मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उजेडात आला. याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमरेड रुग्णालयातील स्वच्छता कामगार शुभम महेश सोनेकर हा शौचालयाची स्वच्छता करीत असताना त्याला शौचालयाच्या सीटमध्येच मृतावस्थेत सदर भ्रूण आढळून आले. उमरेड ग्रामीण रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १३ मध्ये सोमवारी सकाळच्या सुमारास अचानकपणे शौचालय चोकअप झाल्याची समस्या उद्भवली. अशातच स्वच्छता कामगार शुभम सोनेकर हा स्वच्छतेसाठी सदर शौचालयात गेला. शौचालयाच्या सीटची पाहणी केली असता, पुरुष जातीचे भ्रूण त्यास आढळून आले. सदर भ्रूण ६ ते ७ महिन्याचे असल्याची बाब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच पोलीसांना ही माहिती देण्यात आली. अज्ञात महिलेने गर्भात असलेल्या या भ्रूणाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने शौचालयात टाकून निघून गेली असावी, असा अंदाज लावल्या जात आहे. याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात ३१८ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे करीत आहेत. याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एन. खानम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
निर्दयीपणा की अपघात
अज्ञात गरोदर माता ही ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आली असावी, शौचालयासाठी गेली असता अचानकपणे हा प्रकार अपघाती झाला असावा, अशीही बाब बोलली जात आहे. दुसरीकडे हे कृत्य निर्दयीपणाचे अथवा अवैध गर्भपाताचे तर नाही ना, यावरही विविध चर्चा समोर येत आहेत.