हायकोर्ट : जेएमएफसी न्यायालयाने सोडले होते निर्दोषनागपूर : महिला कारागृह अधिकाऱ्यास मारहाण व जखमी करणाऱ्या आणि जेएमएफसी न्यायालयातून निर्दोष सुटलेल्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कठोर शिक्षा सुनावली आहे. अजय रघुराम गालट (५५) असे आरोपीचे नाव असून तो अकोला येथील रहिवासी आहे. आरोपी व्यवसायाने मजूर आहे. उच्च न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३५३ (कर्तव्यावरील सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण) अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड आणि दंड जमा न केल्यास १ वर्षे अतिरिक्त सश्रम कारावास तर, कलम ३३२ (कर्तव्यावरील सरकारी कर्मचाऱ्याला दुखापत करणे) अंतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास व ४० हजार रुपये दंड आणि दंड जमा न केल्यास दीड वर्षे अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा आरोपीला लागोपाठ (एक संपल्यानंतर दुसरी) भोगायची आहे. आरोपीला अटक करून कारागृहात पाठविण्याचे निर्देश अकोला पोलिसांना देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. २६ जुलै २००२ रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने आरोपीची भादंविच्या कलम ३५३ व कलम ३३२ या आरोपांतून निर्दोष सुटका केली होती. याविरुद्ध राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने शासनाचे अपील मंजूर करून जेएमएफसी न्यायालयाचा निर्णय रद्द केला. जेएमएफसी न्यायालयाने आरोपीला निर्दोष सोडताना नोंदविलेली कारणे केवळ हास्यास्पद, दोषपूर्ण व विरोधाभासी नसून न्यायाधीशाचा निष्काळजीपणा दाखविणारीही आहेत, असे मत उच्च न्यायालयाच्या निर्णयात व्यक्त करण्यात आले आहे. आरोपीचे सध्याचे वय ५५ वर्षे असल्यामुळे त्याच्यावर दया दाखविण्याची विनंती संबंधित वकिलाने केली होती. उच्च न्यायालयाने ही विनंती अमान्य करून आरोपीला कठोर शिक्षा करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.(प्रतिनिधी)अशी घडली घटना२२ डिसेंबर २००० रोजी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास अकोला मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकारी स्वाती साठे व अन्य पोलीस कर्मचारी नेहमीप्रमाणे निरीक्षण करीत होते. दरम्यान, आरोपीने अचानक साठे यांच्यावर हल्ला केला. सोबतचे कर्मचारी धावले असता त्यांनाही जबर मारहाण केली. साठे यांनी घटनेच्याच दिवसी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविला. पोलिसांनी तपास पूर्ण करून २९ जुलै २००१ रोजी जेएमएफसी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
महिला कारागृह अधिकाऱ्यास मारहाण करणाऱ्या आरोपीस शिक्षा
By admin | Updated: August 5, 2015 02:45 IST