लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : एजीएम डिजिटल लिमिटेड कंपनीच्या चार मुख्य सूत्रधारांपैकी उमरेड येथील एका मुख्य संचालकाच्या अटकेनंतर नागपूर शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून बरीच माहिती पुढे येत आहे. या कंपनीच्या घोटाळ्याचे कनेक्शन गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पसरले असल्याची विश्वसनीय माहिती तपासात उघड झाली आहे. छत्तीसगढ, मध्य प्रदेश, हिमाचल, दिल्ली आणि महाराष्ट्र अशा एकूण पाच राज्यांमध्ये या कंपनीच्या घोटाळ्याच्या पाळेमुळे पसरली आहेत.
उमरेड येथील अजय कृष्णराव लधवे याच्या अटकेनंतर आता सुशील रमेश कोल्हे, पंकज रमेश कोल्हे, व्यवस्थापक भरत शंकर शाहू (तिघे, रा. नागपूर) यांचा शोध आर्थिक गुन्हे शाखेचे पथक घेत आहे. गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी अजय लधवे यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने उमरेड येथे निवासस्थानी आणले होते. काही मिनिटे निवासस्थानाची चौकशी आणि तपासणीसुद्धा करण्यात आली. १ ऑक्टोबर २०१० पासून सुरू करण्यात आलेल्या एजीएम डिजिटल लिमिटेड कंपनीमार्फत गुंतवणूकादारांना आकर्षित करण्यासाठी चार ते पाच वेगवेगळ्या योजनांची प्रलोभने दाखविण्यात आली होती. यामध्ये १८ महिन्यांत दामदुप्पट, गुंतवणुकीच्या रकमेवर महिन्याकाठी ४० महिन्यांपर्यंत ४.२५ टक्के व्याज त्यानंतर गुंतवलेली रक्कम परत अशी दुसरी योजना होती. तिसरी योजना ३६ महिन्यांची असून, यामध्ये ३.५० टक्के व्याजासह परत, तर चवथी योजना ४० महिन्यांची होती. यामध्ये मूळ गुंतवणुकीवर २.५० टक्के रक्कम आधीच परत केली जात होती. याशिवाय फिक्स डिपॉझिट योजनेचेही आमिष या कंपनीने अनेकांना दाखविले होते. केवळ दोन वर्षांतच सुमारे ४ हजार गुंतवणूकदारांकडून करोडो रुपयांची माया या चौकडीने जमा केली. ३,८६० गुंतवणूकदारांची यादीच तपास यंत्रणेच्या हाती लागल्याची माहिती आहे.
घोटाळा मोठा
सुरुवातीला ३० कोटी रुपयांच्या आसपास एजीएम कंपनीचा घोटाळा असल्याची बाब उजेडात आली. आता चौकशीअंती सदर घोटाळा ५० कोटींपेक्षाही अधिक असल्याचीही शक्यता बळावली आहे. बहुसंख्य गुंतवणूकदार अद्यापही पुढे येण्यास धजावत असून, उमरेड परिसरातील गुंतवणूकदारांना ४ ते ५ कोटी रुपयांचा गंडा बसला असल्याची माहिती समोर येत आहे.
दुय्यम निंबधकास पत्र
नागपूर शहर आर्थिक गुन्हे शाखेने उमरेड येथील दुय्यम निंबधक कार्यालयाकडे पत्र सोपविले आहे. संशयित आरोपी अजय लधवे आणि सुशील कोल्हे यांनी २०१८ पासून ते आजपर्यंत किती खरेदीपत्र व विक्रीपत्र केली, याबाबतची माहिती या पत्राद्वारे मागितली आहे.
भिलाई येथेही गुन्हा दाखल
हजारो गुंतवणूकदारांना ‘मामा’ बनविणाऱ्या एजीएम डिजिटल कंपनीच्या विरोधात भिलाई शहर पोलीस ठाण्यात ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ जानेवारी २०२१ ला न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर सेवानिवृत्त अधिकारी प्रल्हादसिंह ठाकूर यांच्या तक्रारीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सुशील रमेश कोल्हे, पंकज रमेश कोल्हे, भरत शंकर शाहू (तिघे, नागपूर) आणि विजय एम. उईके व हरीश रघुनाथ गायकवाड (दोघे, रा. भिलाई (छत्तीसगढ) यांचा समावेश आहे. त्यानंतर मध्य प्रदेशातील बैतुल येथील निवासी नागेंद्रसिंग बाबूसिंग ठाकूर यांनी लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार नागपूर सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर एजीएम डिजिटल लिमिटेड कंपनीचा फुगा फुटला.