योगेश पांडे नागपूर : शाळकरी विद्यार्थ्यांना मोबाइल दिल्यानंतर ते त्यावर नेमके काय करत आहेत याकडे बरेचदा पालकांचे दुर्लक्ष होते. मात्र, असेच दुर्लक्ष एका कुटुंबाला प्रचंड मनस्ताप देणारे ठरले. १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीला स्मार्ट फोनवर ऑनलाइन गेम खेळण्याचा नाद लागला. त्या गेमच्या माध्यमातून ते सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकली व तिचे इन्स्टाग्राम खाते हॅक करण्यात आले. ते खाते पूर्ववत करण्यासाठी गुन्हेगारांनी आईकडून खंडणी वसूल केली व वर्षभर त्रास दिला. त्यानंतर वडिलांना मोठी खंडणी मागत थेट कुटुंबीयांना गोळ्या मारत संपविण्याचीच धमकी दिली. वर्षभरापासून कुटुंबीयांच्या डोक्याला ताप देणारे हे सायबर गुन्हेगार अद्यापही पोलिसांसाठी ‘आऊट ऑफ रिच’ असून, कुटुंबाला नाहक डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे.
ही एकूणच घटना पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. संबंधित तक्रारदाराला १३ वर्षीय मुलगी आहे. अभ्यासात मदत व्हावी या उद्देशाने तक्रारदाराने तिला स्मार्ट फोन घेऊन दिला होता. मात्र, विद्यार्थिनीकडून त्यावर ऑनलाईन गेम खेळण्यात येत होते. प्रामुख्याने ती ‘फ्रीफायर’ हा गेम खेळायची. मात्र, त्यातून ती सायबर गुन्हेगारांच्या सापळ्यात अडकली. तिची रोहन वर्मा नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. ऑनलाईन गेम खेळताना विद्यार्थिनीने त्याच्यासोबत माहिती शेअर केली. तसेच इन्स्टाग्रामचे तपशीलदेखील दिले. गुन्हेगाराने त्याच्या आधारावर तिचे इन्स्टाग्राम खाते ‘हॅक’ केले. याची माहिती मुलीच्या आईला कळाली. मुलीचे इन्स्टाग्राम खाते हॅक झाल्याने त्यावरून काहीही अश्लील कंटेंट शेअर होऊ शकतो याची कल्पना असल्याने आई हादरली. सायबर गुन्हेगारांनी तिला सुरुवातीला चार हजार रुपये मागितले व पैसे मिळाल्यावर इन्स्टा खाते पूर्वपदावर येईल अशी बतावणी दिली. आईने गुपचूप त्यांना पैसे दिले. मात्र, त्यानंतरदेखील खाते हॅकच होते.
आरोपींनी अडीच लाखांची मागणी केली व वर्षभर ते विविध माध्यमांतून धमकी देत होते. अखेर हिंमत करून मायलेकींनी वडिलांना या प्रकाराची माहिती दिली. वडिलांनी सायबर सेलमध्ये तक्रारदेखील केली होती. मात्र, त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी वडिलांना संपर्क केला व अडीच लाख रुपये मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर समोरील व्यक्तीने बदनामी करण्याची तसेच संपूर्ण कुटुंबाला बंदुकीच्या गोळ्या झाडून ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे हादरलेल्या वडिलांनी अखेर सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
लपवाछपवी पडली महागातज्यावेळी इन्स्टाग्राम खाते हॅक झाले होते, त्याचवेळी आरोपींबाबत मुलीने पालकांना माहिती द्यायला हवी होती. मात्र, तसे न केल्याने नाहक वर्षभर मनस्ताप सहन करावा लागला. आईनेदेखील वडिलांना विश्वासात न घेतल्याने सायबर गुन्हेगारांना पैसे दिले. त्यामुळे त्यांची हिंमत आणखी वाढली.
ऑनलाइन गेम धोकादायकचसायबर गुन्हेगारांकडून ऑनलाइन गेमच्या माध्यमातून शाळकरी विद्यार्थ्यांना टार्गेट करण्याचे बरेच प्रकार समोर आले आहेत. काही प्रकरणांत तर गुन्हेगारांनी फोनच हॅक करून पालकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे, तर काही प्रकरणांत मुलांना ब्लॅकमेल करून पालकांचे तपशील शेअर करण्यास बाध्य केले. त्यामुळे पालकांनी मुलांच्या ऑनलाइन ॲक्टिव्हिटीजवर लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे.