नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील खासदारांनी प्रत्येकी एक गाव दत्तक घेऊ न त्याचा विकास करण्याचा संकल्प केला आहे. याच धर्तीवर जिल्ह्यातील शाळांचा दर्जा सुधारावा या हेतूने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांतील गटशिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्येक तालुक्यातील एक शाळा दत्तक घेण्याचे निर्देश दिले आहे.जि.प. शाळांचा दर्जा उंचवावा, त्यांचा नावलौकिक व पटसंख्या वाढावी, या हेतूने हा उपक ्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. दत्तक घेतलेल्या शाळांचा कायापालट करून ती आदर्श करावी. येथे शौचालय, पिण्याचे पाणी, क्रीडांगण, वृक्षारोपण, संरक्षक भिंत बांधकाम तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे निर्देश दिले आहे.दत्तक घेण्यात आलेल्या जि.प. शाळांची नावे अशी (कंसात तालुका) प्राथमिक शाळा किरणापूर (नागपूर), प्राथमिक शाळा मोहगाव (हिंगणा), उच्च प्राथमिक शाळा भिलगाव (कामठी), उच्च प्रा. शाळा सोनखांब (काटोल), प्रा. शाळा बानूर (नरखेड), प्रा. शाळा पारडी (सावनेर), प्रा. शाळा सिंदी (कळमेश्वर), प्रा. शाळा घोटी (रामटेक), प्रा. शाळा भेंडाळा (मौदा), प्रा. शाळा साहोली (पारशिवनी), प्रा. शाळा बेलसाखरा (उमरेड), प्रा. शाळा आकोली (कुही) व भिवापूर तालुक्यातील भागेबोरी येथील प्रा. शाळेचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील जि.प. शाळांतून आदर्श ठरणाऱ्या शाळांना १ मे २०१५ रोजी पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. यातून शिक्षक व मुख्याध्यापकांना प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा सावरकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
गटशिक्षणाधिकारी घेणार १३ शाळा दत्तक
By admin | Updated: January 15, 2015 00:53 IST