नागपूर : माझ्या अनिलला औषध हवे, उपचार हवेत, त्याचा जीव वाचावा एवढीच विनंती आहे. त्याचे पालक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर जीवतोडून विनंती करीत होते. एक महिन्याचा असताना मुंबईच्या पेडर रोडवर फेकलेल्या अवस्थेत आढळून आलेला अनिल तेव्हापासून बाबाच्या सोबत आहे. मतिमंद असल्याने तो गेली १६ वर्षे खाटेवरच आहे. त्याला खांद्यावर बसवून दुनिया दाखविणारा बाबा त्याच्या जीवासाठी याचना करताना आज दिसले. सव्वाशे मुलामुलींसाठी जीवाचे रान करणारे शंकरबाबा अनिलसाठी हळवे झाले होते. मेडिकलच्या वॉर्ड क्र. २६ येथे अनिलवर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.अमरावती जिल्ह्याच्या वझ्झर गावातील एका टेकडीवर शंकरबाबांनी अनाथ, अपंग मुलांसह नंदनवन फुलवलं आहे. शासनाची मदत न घेता दानदात्यांच्या मदतीने हा बाप १२३ मुलामुलींचे कुटुंब आनंदाने चालवत आहे. या चिमुकल्यांचा शेंबूड काढण्यापासून त्यांची पूर्ण शुश्रूषा बाबा स्वत:च्या हाताने करतो. या सर्वांसाठी त्यांचा जीव तुटतो. अनिलची अचानक तब्येत खराब झाल्याने हा बाबा पोराला सांभाळा हे एकच आवाहन जो मिळेल त्याला करीत आहे.‘लोकमत’शी फोनवरून बोलताना बाबा म्हणाले, एक महिन्याचा असताना मुंबई येथील पेडर रोडवर बेवारस स्थितीत एक महिन्याचा अनिल पोलिसांना मिळाला. अधिष्ठात्यांनी घेतली तत्काळ दखलअधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना अनिलविषयी ‘लोकमत’कडून माहिती मिळताच औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. वृंदा सहस्रभोजनी यांच्याकडून उपचाराची माहिती घेतली. मुलगा मतिमंद असल्याने रुग्णावर एकही रुपयाचा भुर्दंड पडणार नाही, वेळप्रसंगी रुग्णालय प्रशासन स्वत:च्या तिजोरीतून खर्च करेल, अशी ग्वाही दिली. सायंकाळी त्यांनी स्वत: मुलाची तपासणी करून प्रकृती स्थिर असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.
माझ्या मुलाचे प्राण वाचवा...
By admin | Updated: March 16, 2016 08:39 IST