आमदार निधीतून कामे : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन नागपूर : मौजा सोमलवाडा येथील जयदुर्गा सोसायटी नं २ येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांच्या विकास निधीतून समाज भवन व जॉगिंग ट्रॅक उभारण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मनीषनगर, सोमलवाडा, या परिसरात नागरीकरण झपाट्याने वाढत असून, नवनवीन वसाहती निर्माण होत आहेत. याकडे विशेष लक्ष देऊन परिसराचा विकास तसेच नागरिकांना सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता या भागातील नगरसेवक व मी आमदार या नात्याने कटिबद्ध आहे. या परिसराच्या विकासाकरिता निधीची कमतरता कधीही पडू देणार नाही, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. त्याचबरोबर पॅनथॉन सोसायटी गार्डन व जॉगिंग ट्रॅक, भारतीय गृहनिर्माण सोसायटी प्रभूनगर येथे हायमास्क टॉवर जॉगिंग ट्रॅक, तसेच फ्रेंड्स कॉलनी येथील गार्डन व जॉगिंग ट्रॅकचे भूमिपूजन फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक अविनाश ठाकरे, नगरसेविका जयश्री वाडीभस्मे, रमेश भंडारी, आशिष पाठक, घनश्याम खवले, अजय गायकवाड, मनीष वैद्य, जगदीश टुले, नारायण धन्दोडे, सुशांत वाघ, राजू बहाद्दुरे, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)
सोमलवाड्यात उभारणार समाजभवन व जॉगिंग ट्रॅक
By admin | Updated: August 14, 2014 01:19 IST