बजरंग दल, शिवसेना आक्रमक : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस देणार संरक्षणनागपूर : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली आपली राजकीय पोळी शेकून घेण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढीस लागला आहे. यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’वरदेखील राजकारणाचे सावट आहेच. मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील बजरंग दल, शिवसेना यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने विरोधाची तयारी चालवली आहे. दुसरीकडे या दिवशी प्रेमीयुगुलांना संरक्षण देण्यासाठीदेखील राजकीय पक्ष मैदानात उतरले असून राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पक्षाने यासंदर्भात दावे केले आहेत. मागील वर्षी संस्कृतीरक्षणाच्या नावाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड धुडगूस घातला होता. काही कार्यकर्त्यांनी तर अतिउत्साहात तरुणींचा अक्षरश: विनयभंगदेखील केला होता. फुटाळा, बॉटनिकल गार्डन, अंबाझरी उद्यान येथील प्रेमीयुगुलांची यामुळे त्रेधातिरपीट उडाली होती. यावर्षीदेखील बजरंग दल तसेच शिवसेनेतर्फे विरोध प्रदर्शन होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन तरुणांच्या भावनांशी जुळलेल्या या मुद्यात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसनेदेखील उडी घेतली आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रेमीयुगुलांना संरक्षण देण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने पथके तयारी केली आहेत. यात कार्यकर्त्यांसोबतच सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश राहणार आहे. प्रेमीयुगुल तसेच विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्यांना पकडण्यात येईल व पोलिसांच्या हवाली करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
प्रेमदिवसाचेही राजकारण
By admin | Updated: February 14, 2016 03:00 IST