भालचंद्र मुणगेकर : नागपूर विद्यापीठाचा ९२ वा वर्धापनदिन साजरानागपूर : सर्वांना समान संधी मिळावी या जाणीवेतून शिक्षणप्रणालीला नवीन चेहरा देण्यात आला होता. परंतु आजच्या तारखेत उच्चशिक्षणप्रणालीसमोर अनेक आव्हाने आहेत. अनेक समस्या तर गंभीर असून शिक्षणप्रणाली पत्त्यांप्रमाणे ढासळण्याच्या मार्गावर असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय योजना आयोगाचे माजी सदस्य खा.डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ९२ व्या वर्धापनदिनाच्या समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.मंगळवारी गुरुनानक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कारासोबतच विद्यापीठांच्या इतर पुरस्कारांचेदेखील वितरण करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, कुलसचिव पुरण मेश्राम व ‘बीसीयूडी’ संचालक डॉ.डी.के.अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते. कऱ्हाड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व ग्रामगीता देऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्काराने गौरव करण्यात आला . त्याचप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.वंचितांना विकासाची संधी मिळाली पाहिजे हे शिक्षणव्यवस्थेचे उद्दिष्ट आहे. परंतु या उद्दिष्टात व प्रत्यक्ष परिस्थितीत तफावत दिसून येत आहे. देशभरात सर्व विद्यापीठांसाठी सारखा अभ्यासक्रम व समान कायदा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक विद्यापीठाच्या आवश्यकता व समस्या वेगळ््या असतात. याला शिक्षणतज्ज्ञ व विद्यापीठांनी विरोध केला पाहिजे. विशेष म्हणजे राजकीय दबावाखाली न येता कुलगुरूंनी कणखर भूमिका घ्यायला हवी असे डॉ. मुणगेकर म्हणाले. डॉ.मिश्रा यांनी पुरस्कार त्यांच्या आई व पत्नीला समर्पित केला. विद्यापीठाने मला अभूतपूर्व प्रेम दिले आहे. मला काय करायचे नाही हे मी ठरवले होते. त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी करू शकलो. सर्वांना सोबत घेऊन चाललो व आजही तेच करतो आहे असे मत डॉ.मिश्रा यांनी व्यक्त केले. कुलगुरूंनीदेखील यावेळी मार्गदर्शन केले. प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी प्रास्ताविक केले तर कुलसचिव पुरण मेश्राम यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.कोमल ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यापीठाच्या निरनिराळ््या प्राधिकरणांचे सदस्य, अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिक्षणप्रणाली ढासळण्याच्या मार्गावर
By admin | Updated: August 5, 2015 02:42 IST