लाेकमत न्यूज नेटवर्क
पचखेडी : कुही तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांची पेन्शन तीन महिन्यापासून मिळाली नाही. आधीच काेराेना संक्रमण, त्यातच रखडलेली पेन्शन रक्कम यामुळे या सेवानिवृत्तांना आर्थिक संकटांना ताेंड द्यावे लागत आहे.
कुही तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना जानेवारी - २०२१ मध्ये पेन्शन दिली हाेती. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च व एप्रिलची पेन्शन अद्याप मिळाली नाही, अशी माहिती पचखेडी (ता. कुही) येथील सेवानिवृत्त शिक्षक मदन खडसिंगे, दिलीप तेलरांधे, विनायक रेहपाडे यांच्यासह इतर सेवानिवृत्तांनी दिली.
डाेमाजी धनरे नामक सेवानिवृत्त शिक्षकाचा चार महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. त्यांना अद्यापही पेन्शनची रक्क्म मिळाली नाही. ती रक्कम मिळण्यासाठी त्यांचे कुटुंबीय शासकीय कार्यालय व बॅंक शाखेचे हेलपाटे मारत आहे. मात्र, काहीही उपयाेग हाेत नाही, असे मदन खडसिंगे या सेवानिवृत्त शिक्षकाने सांगितले. हल्ली परिसरातील सेवानिवृत्त मंडळी सकाळी व सायंकाळी एकत्र येतात आणि रखडलेल्या पेन्शवर गप्पा करीत एकमेकांना धीर देतात. त्यांच्या कुटुंबाची हाेणारी आर्थिक फरफट दूर करण्यासाठी त्यांना पेन्शनची रक्कम तातडीने देण्यात यावी अशी मागणीही केली जात आहे.
...
बॅंक शाखांचे हेलपाटे
पेन्शनची रक्कम बॅंक खात्यात जमा करण्यात आली की नाही याबाबत माहिती मिळत नसल्याने वृद्ध कर्मचाऱ्यांना त्याची चाैकशी करण्यासाठी बॅंक शाखेचे हेलपाटे मारावे लागतात. पैशाअभावी आर्थिक संकटांना ताेंड द्यावे लागत असून, दैनंदिन गरजा व औषधांचा खर्च भागवायचा कसा असा प्रश्न भेडसावत असल्याची माहिती काही सेवानिवृत्त शिक्षकांनी दिली. या प्रकारामुळे त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.