नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फीडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती मोबाईलच्या व्हॉट्सॲपद्वारे द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले होते. या आवाहनाला वीज ग्राहकाकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. पाहिल्याच आठ्वड्यात महावितरणकडे आलेल्या ५८ तक्रारीपैकी ४६ तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याची माहिती मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली.
नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीसह बुटीबोरी, हिंगणा तालुक्यातील वीज ग्राहकांसाठी ७८७५०१००५२ तर उर्वरित ग्रामीण भागासाठी ७८७५७६६६९१ हा क्रमांक महावितरणकडून वीज ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकांवर फक्त वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती, तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत.