लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी तहसील कार्यालयाच्या सभागृहात आरक्षण जाहीर करण्यात आले. या निघालेल्या आरक्षणाने अनेक इच्छुकांचे सरपंच होण्याचे स्वप्न भंगले आहे. ५० पैकी २५ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव असून, यात सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी १२, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी ७, अनुसूचित जाती महिला साठी ४ तर अनुसूचित जमाती महिलांसाठी २ जागांचा समावेश आहे.
आरक्षण जाहीर करताना नायब तहसीलदार सुजाता गावंडे, नायब तहसीलदार योगिता दराडे, सभापती श्रावण भिंगारे, उपसभापती जयश्री वाळके, जि. प. सदस्य महेंद्र डोंगरे, माजी सभापती वैभव घोंगे, बिलाल खान तसेच नागरिक उपस्थित होते.
सर्वसाधारण महिलांसाठी सोनोली, चाकडोह, तिष्टी(बु), धापेवाडा (बु), सावळी(बु), सावळी(खुर्द), कन्याडोल, गोंडखैरी, आष्टीकला, दहेगाव, साहुली, सोनेगाव. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी तेलकामठी, म्हसेपठार, बुधला, निळगाव, पिपळा (किनखेडे) पानऊबाळी, खैरी (लखमा),
अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी खुमारी, आदासा, वरोडा, उपरवाही. सर्वसाधारण प्रवर्गासाठी मांडवी, लोहगड, तिडंगी, नांदीखेडा, कोहळी, सुसुंद्री, मोहगाव, झुनकी, मढासावंगी, लोणारा, तोंडाखैरी, कळंबी. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पिल्कापार, पारडी (देशमुख), बोरगाव (बु), बोरगाव (खुर्द), वाढोणा (बु), सेलू. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तेलगाव, खापरी (कोठे), निमजी, लिंगा. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी भडांगी, उबाळी, परसोडी, अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी सावंगी (तोमर), घोराड या गावांचा समावेश आहे.
..........
मोठ्या ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित
तालुक्यातील राजकीय वातावरण प्रभावित करणाऱ्या मोठ्या लोकसंखेच्या ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित झाल्याने निश्चितच महिलाप्रधान राजकारण तालुक्याला अनुभवता येणार आहे. ५० टक्के महिला आरक्षणाने राजकारणातील पुरुषांची मक्तेदारी मोडित निघत असली तरी अशावेळी उपसरपंचपदाची माळ स्वतःच्या गळ्यात पाडून आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न विद्यमान लोकप्रतिनिधींकडून होणार आहे.
........
राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात
सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर होताच गावागावात स्वयंघोषित नेते मंडळी गावातील राजकीय वातावरण प्रदूषित करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. सरपंचपदासाठी आपल्याला गावातून पाठबळ मिळणार नाही, याबाबत त्यांना निश्चित माहिती असल्याने स्वतःची राजकीय पोळी शेकून घेण्याकरिता स्वतःच्या मर्जीतील व्यक्तीला सरपंचपदी कसे आरुढ करता येईल, यासाठी ‘सेटिंग’ लावण्यास प्रयत्नशील झाले आहेत.