नागपूर : मागील काही दिवसांत शहरात दैनंदिन लसीकरण नऊ हजारांपुढे जात असताना गुरुवारी लसीकरणात घट आली. ६७७५ लाभार्थींचेच लसीकरण झाले. महाशिवरात्री असल्याने व केंद्राला सुटी असावी या शंकेने लसीकरण कमी झाल्याचे बोलले जात आहे. परंतु आता १५ मार्चपासून लॉकडाऊन असल्याने लसीकरणात मोठी वाढ दिसून येण्याचीही शक्यता आहे.
शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढून ६० झाली आहे. यात १२ शासकीयसह ४८ खासगी केंद्रांचा समावेश आहे. सर्व केंद्र मिळून ६० वर्षांवरील ४१४६ ज्येष्ठांनी आज लस घेतली. या शिवाय, ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या १५२८ लाभार्थींनी, ७१४ हेल्थ केअर वर्कर व ३८७ फ्रंटलाइन वर्कर होते. ५०८ लाभार्थींनी दुसरा डोस घेतला. लॉकडाऊनमध्येही लसीकरण केंद्र सुरू राहणार आहे. लाभार्थींना केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १ मार्चपासून सुरू झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणात आतापर्यंत लस घेतल्यानंतर एकाही लाभार्थींला गंभीर स्वरूपातील समस्या दिसून आल्या नाहीत.