आनंद शर्मा
नागपूर : अजनी रेल्वे कॉलनी येथे कोट्यवधी रुपये खर्चून स्थापन करण्यात आलेली मेकॅनाईज्ड लॉन्ड्री कोरोना संक्रमणामुळे धूळखात पडली आहे. सध्या एसी कोचमध्ये प्रवास करणाऱ्यांना चादर, ब्लँकेट इत्यादीचा पुरवठा बंद आहे. परिणामी, सदर लॉन्ड्रीही बंद आहे. येथील यंत्रे निरुपयोगी झाली आहेत. ही लॉन्ड्री रेल्वे मंडळाच्या निर्णयानंतरच सुरू होऊ शकते.
एसी कोचमध्ये प्रवास करणाऱ्यांना चादरी, ब्लँकेट, टॉवेल, उशीच्या खोळी स्वच्छ हव्या असतात. त्यामुळे १० कोटी रुपये खर्च करून १५०० चौरस मीटर भूखंडावर ही लॉन्ड्री स्थापन करण्यात आली. ४ जानेवारी २०१८ रोजी सुरू झालेले लॉन्ड्रीचे काम गेल्या सप्टेंबरमध्ये पूर्ण झाले. लॉन्ड्रीमध्ये ८ टन क्षमतेची आधुनिक यंत्रे बसविण्यात आली आहेत. तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी २०११-१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पात नागपूर, भोपाळ, चंदीगड इत्यादी ठिकाणी लॉन्ड्री स्थापन करण्याची घोषणा केली होती. हैदराबाद येथील सुप्रीम लॉन्ड्रीला ‘बिल्ड, ओन, ऑपरेट ॲण्ड ट्रान्सफर’ तत्वावर या लॉन्ड्रीचे १० वर्षासाठी कंत्राट देण्यात आले आहे. त्यानंतर ही लॉन्ड्री रेल्वेला हस्तांतरित केली जाईल.
-----------------
यंत्रे निरुपयोगी पडली आहेत
लॉन्ड्रीमधील आधुनिक यंत्रे चादर, ब्लँकेट आदी धुणे, पिळणे, वाळवणे व घडी करणे ही कामे करतात. परंतु, सध्या ही यंत्रे निरुपयोगी पडली आहेत. येथे स्वच्छ केलेल्या चादरी, ब्लँकेट आदी सर्वप्रथम मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातील रेल्वेना उपलब्ध करून दिले जातील. त्यानंतर मुख्यालयाची परवानगी घेऊन इतर रेल्वेना पुरवठा केला जाईल.
-------------
हॉटेल, रुग्णालयांत पुरवठ्याचा विचार
रेल्वेत पुरवठा बंद असल्यामुळे लॉन्ड्रीला नुकसान होऊ शकते. करिता, खासगी हॉटेल, रुग्णालये इत्यादी ठिकाणी स्वच्छ चादरी, ब्लँकेट आदी पुरविण्यावर विचार केला जात आहे. सध्या यावर अंतिम निर्णय झाला नाही.
----------------
रेल्वे मंडळ घेईल निर्णय
हॉटेल, रुग्णालये इत्यादी ठिकाणी स्वच्छ चादरी, ब्लँकेट आदी पुरविणे धोरणात्मक बाब आहे. यासंदर्भात रेल्वे मंडळच निर्णय घेऊ शकते. सध्या याविषयी काहीच सूचना मिळाली नाही.
----- कृष्णाथ पाटील, वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर मंडळ.
------------
प्रकल्पाची संक्षिप्त माहिती
- २०११-२०१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा
- लॉन्ड्रीवर १० कोटी रुपये खर्च झाले
- अजनी रेल्वे परिसरात स्थापना
- आधुनिक यंत्रे लावण्यात आली
- दोन सत्रात होईल धुण्याचे काम
- वॉटर रिसायकलिंगची व्यवस्था
- बुट तत्वावर दिले कंत्राट