लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - परिमंडळ -२ च्या पोलीस उपायुक्त विनीता शाहू यांच्या विशेष पथकाने मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका मटका अड्ड्यावर मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी छापा मारला. येथे मटका अड्डा चालविणारे पाच आरोपी पकडून त्यांच्याकडून सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
मानकापूरच्या गंगानगर झोपडपट्टीत गेल्या अनेक महिन्यापासून उईके, कापसे, मेश्रामचा मटका अड्डा सुरू होता. येथे रोज हजारोंची लेनदेन होत होती. ही माहिती कळाल्याने पोलीस उपायुक्त शाहू यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी या मटका अड्ड्यावर छापा मारून तेथे मटक्याची खायवाडी करणारे आरोपी प्रफुल्ल श्रीराम उईके, सौरभ गंगाधर कापसे, मुकेश राजू गेडाम, सागर रमेश श्रीवास आणि सिकंदर बाबूराव मेश्राम या पाच जणांना रंगेहात पकडले, तर त्यांचा साथीदार तुलसी मसराम पळून गेला. पकडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल आणि मटक्याच्या साहित्यासह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस उपायुक्त साहू यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूरचे वरिष्ठ निरीक्षक गणेश ठाकरे, उपिनरीक्षक कैलास मगर, प्रवीण राऊत, क्रिष्णा पुल्लेवार, हवालदार रवींद्र भुजाडे, गणेश जोगेकर, प्रीतम येवले, विशाल अंकलवार, अंकुश राठोड, रोशन वाडीभस्मे आणि आकाश कुबडे यांनी केली.