नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागांंतर्गत जागांसाठी होणाऱ्या भरती परीक्षेतील समस्या आधीच निकाली न काढता परीक्षा रातोरात पुढे ढकलण्या निर्णयाचा मेयो, मेडिकलमधील पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांनी निषेध नोंदविला. शनिवारी विद्यार्थ्यांनी काळी रिबीन बांधून रुग्णसेवा दिली तर काहींनी मेडिकलच्या समोर नारे-निदर्शने केली.
आरोग्य विभागाच्या वतीने २५ सप्टेंबर रोजी ‘गट क’ संवर्गातील २ हजार ७३९ पदांसाठी तर, २६ सप्टेंबर ‘गट ड संवर्गातील ३ हजार ४६६’ पदांसाठी रोजी लेखी परीक्षा होणार होती. या परीक्षेच्या ‘हॉल तिकीट’चा गोंधळ आधीपासूनच चर्चेत होता. काहींच्या नावात घोळ होता. बहुसंख्य विद्यार्थ्यांना हवे ते सेंटर मिळाले नव्हते. काही विद्यार्थ्यांना तर महाराष्ट्राबाहेर परीक्षा केंद्र देण्यात आले होते. याच्या तक्रारीही झाल्या. परंतु कोणत्याही अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. अखेर नाईलाजेपोटी विद्यार्थी एक दिवसापूर्वीच केंद्राच्या ठिकाणी पोहचले. परंतु शुक्रवारी रात्री अचानक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षेची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या बाह्यस्रोत संस्था ‘न्यासा कम्युनिकेशन’च्या अकार्यक्षमतेचे कारण देत, परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच विद्यार्थ्यांना याचा फटका बसला.
याचा निषेध म्हणून शनिवारी सकाळी ‘पॅरामेडिकल स्टुडंट वेलफेअर ॲण्ड ॲल्युमिना असोसिएशन’च्या वतीने मेयो व मेडिकलच्या पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांनी मेडिकलच्या परिसरात नारे-निदर्शने केली. जे विद्यार्थी रुग्णसेवेत होते त्यांनी काळी रिबीन बांधून सेवा दिली. पॅरामेडिकल स्टुडंट वेलफेअर ॲण्ड ॲल्युमिना असोसिएशनचे राज्याध्यक्ष अक्षय गायधने म्हणाले, सरकारने विद्यार्थ्यांशी चालविला खेळ थांबवायला हवा. ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसला, त्याची परतफेड व्हायला हवी.
नागपूर विभागातून ६४ हजार ७४९ विद्यार्थी देणार होते परीक्षा
सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘गट क’ संवर्गासाठी शनिवारी होणाऱ्या परीक्षेत नागपूर विभागातून ३८ हजार ६६७ तर ‘गट ड’ संवर्गासाठी रविवारी होणाऱ्या परीक्षेत ६४ हजार ७४९ विद्यार्थी परीक्षा देणार होते. परंतु परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
विभागानुसार व्हायला हव्यात परीक्षा
आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, राज्यात आठ विभाग आहेत. पदभरतीच्या परीक्षा या विभागानुसार व्हायला हव्यात. यामुळे परीक्षेचे नियोजन करणे सोपे ठरते. सोबतच येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करता येतात. शिवाय, एखाद्या विभागात काही समस्या निर्माण झाल्यास केवळ त्याच विभागातील परीक्षा रद्द करता येतात.