लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याच्या कोरोनाशी संबंधित विविध चाचण्या आणि तपासण्या पूर्ण करून त्याला कारागृहात परत आणण्यात आले. ‘डॉन’च्या जेलवापसीमुळे स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. चार दिवसांपूर्वी अरुण गवळीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्याच्यावर मध्यवर्ती कारागृहातीलच रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, गुरुवारी रात्री गवळीची प्रकृती जास्त वाटत असल्याने त्याला आणि ईतर चार कैद्यांना मेडिकलमध्ये तपासण्यासाठी नेण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने वरिष्ठांशी सल्लामसलत करून घेतला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ‘डॉन’सह पाच जणांना कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मेडिकलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. ट्रामा केअरमध्ये डॉक्टरांच्या पथकाने ‘डॉन’सह पाचही जणांच्या विविध वैद्यकीय तपासण्या करून घेतल्या. तपासणीत सर्वांच्या ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल ९९-९८ तर सिटीस्कॅन रिपोर्टही नॉर्मल आला. त्याचे
ब्लड सॅम्पल घेण्यात आले. त्याचे रिपोर्ट उद्या येणार आहे. दरम्यान, डॉनला प्रकृती खालावल्यामुळे मेडिकलमध्ये भरती केल्याचे आणि आता त्याच्यावर तेथेच उपचार केले जाणार असल्याचे वृत्त सर्वत्र चर्चेला आल्याने विशिष्ट वर्तुळात चर्चेचे मोहोळ उडाले. डॉनला मेडिकलमध्ये ठेवण्याचे धोके ध्यानात आल्याने सुरक्षा यंत्रणांमध्येही खळबळ निर्माण झाली. दरम्यान, डॉन’सह सर्वांचीच प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दुपारी सांगण्यात आले. त्यानंतर डॉनसह पाचही जणांना कारागृहात परत आणण्यात आले. या घडामोडीमुळे सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
---
कारागृहातच करू उपचार - अधीक्षक कुमरे
अरुण गवळीसह पाचही कोरोनाबाधितांच्या रक्त तपासणीचे अहवाल उद्या शनिवारी येणार आहे. मात्र, आज शुक्रवारी केलेल्या सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल आले. त्यामुळे या सर्वांवर कारागृहातील रुग्णालयातच यापुढचे सर्व उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी लोकमतला दिली.