मागील सहा महिन्यांपासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेकडून राज्यातील प्राथमिक शाळांमधील वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांकरिता स्वाध्याय उपक्रम राबविण्यात येत होता. या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विविध गृहकार्य करून घेतले जात होते. विषयानुरूप स्वाध्याय सोडवून घेतले जात होते. ग्रामीण भागात या उपक्रमाला फारसा प्रतिसाद नव्हता. अलीकडेच १ मेपासून शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. परंतु स्वाध्याय उपक्रम मात्र सुरूच होता. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी एकप्रकारे ऑनलाईन शाळा सुरूच होती. सध्या राज्याच्या विविध जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट जोरात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक लोकांचे व्यवसाय बंद आहेत. अनेक पालकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे जीवनावश्यक बाबींशिवाय इतर खर्च करणे पालकांना परवडणारे नाही. अनेक पालक संक्रमित असल्याने गृहविलगीकरणात आहेत, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास शक्य नाही. त्यामुळे या उपक्रमास अत्यंत कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. सुट्टीच्या काळात स्वाध्याय उपक्रमास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीसह इतर काही शिक्षक संघटनांकडून शिक्षण संचालकांकडे करण्यात आली होती. एकूणच राज्यातील सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेकडून स्वाध्याय उपक्रम सध्या स्थगित करण्यात आल्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
‘स्वाध्याय’ उपक्रमास स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:07 IST