तिसऱ्यांदा रखडला प्रस्ताव : पाच महिन्यांपासून प्रलंबितनागपूर : केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, दिल्ली (सीझेडए) ने महाराज बाग प्रशासनाला प्राणिसंग्रहालयाच्या विकास कार्यासाठी सुधारीत ‘मास्टर प्लॅन’ गतीने पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीझेडए चे एक पत्र प्राणिसंग्रहालयाला २९ जानेवारी रोजी प्राप्त झाले. त्यामुळे महाराज बाग प्रशासन प्लॅन पाठविण्याच्या तयारीला लागले आहे. मागील अडीच वर्षापासून महाराज बागच्या ‘मास्टर प्लॅन’ ला सीझेडएची मंजुरी मिळू शकलेली नाही. यामुळे प्राणिसंग्रहालयाला मिळणारी आर्थिक मदत आणि नवनिर्माणाचे कार्य थांबले आहे. १४ आॅगस्ट २०१४ रोजी तिसऱ्यांदा सीझेडएने महाराज बागचा मास्टर प्लॅन नव्या सूचनांसह बदल करण्यासाठी परत पाठविला होता. यानंतर मास्टर प्लॅनमध्ये पुन्हा काही बदल करण्यात येत आहेत. महाराज बाग प्रशासनाने २०१२ साली मास्टर प्लॅन तयार करण्याची जबाबदारी जन संसाधन संस्था, भोपाळला दिली होती.याच्या मोबदल्यात संस्थेला देण्यात येणाऱ्या ५ लाखांच्या शुल्कापैकी अडीच लाख रुपयांचा निधी देण्यातही आला. प्रथम प्लॅनच्या मंजुरीसाठी फेब्रुवारी २०१२ साली दिल्लीला प्रस्ताव पाठविण्यात आला. हा प्रस्ताव जवळपास एक वर्षानंतर सीझेडएने आवश्यक सूचनांसह परत पाठविला. यानंतर दुसऱ्यांदा प्लॅनमध्ये काही सुधारणा करुन आॅक्टोबर २०१३ साली सीझेडएला पाठविण्यात आला. यानंतर तिसऱ्यांदाही सुधारणांसह प्रस्ताव पाठविण्यात आला. तीनही वेळा प्राधिकरणाने हा प्लॅन सुधारणेच्या सूचनांसह परत पाठविला. आता पुन्हा प्लॅनमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न गेल्या पाच महिन्यांपासून करण्यात येत आहे. प्लॅनमध्ये संपूर्ण सुधारणा झाल्यावर कृषी विद्यापीठाचे सहायक अधिष्ठात्यांच्या माध्यमातून हा प्लॅन मंजुरीसाठी दिल्लीला पाठविण्यात येईल. यासंदर्भात महाराज बागचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)प्लॅनप्रमाणे काय आणि कसे होणार महाराज बाग प्राणिसंग्रहालयात नवीन पिंजरे आणि पिंजऱ्यांच्या आधुनिकीकरणासाठी १० कोटी रुपयांचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत बिबट, अस्वल, नीलगाय आणि अन्य प्राण्यांसाठी नवीन पिंजरे तयार करण्यात येतील. वाघाच्या पिंजऱ्याला आधुनिक स्वरूप देण्यात येईल. याशिवाय प्रवेशद्वार, प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था, हॉस्पिटल, उपाहारगृह, शौचालय आदी सुविधा निर्माण केल्या जातील. प्राणिसंग्रहालयात उपलब्ध डॉक्टरांच्या शिवाय १ समन्वयक, २ शिक्षणाधिकारी, १ जीवशास्त्रज्ञ, २ प्रमुख प्राणी समन्वयक आणि २५ अॅनिमल कीपरची नियुक्ती करण्यात येईल.सीझेडए चमू पोहोचली होती महाराज बागेची मान्यता ३० एप्रिल २०१४ रोजी संपली आहे. यासंदर्भात आॅगस्ट २०१४ मध्ये केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, दिल्लीचे सदस्य ए. बी. श्रीवास्तव आणि ए. के. मल्होत्रा निरीक्षण करण्यासाठी महाराज बागेत आले होते. त्यांनी महाराज बाग येथे काही सुधारणा आणि पिंजऱ्यांची डागडुजी करण्याचे तसेच काही सुधारणा करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती आहे.
महाराज बागचा ‘मास्टर प्लान’ पाठवा
By admin | Updated: February 2, 2015 01:06 IST