यशोसागर : बुद्ध महोत्सवातील रत्नावली व्याख्यानमालानागपूर : आचार्य पद्मसंभव हे धम्म तत्त्वज्ञानाचे प्रकांड पंडित होते. धम्माचे ज्ञान म्हणजे अमृत शिक्षण असल्याचीच त्यांची भावना होती. त्यांनी मृत्यूचे चिंतन केले होते आणि जीवनाचाही अभ्यास केला. हे जीवन इतरांच्या उपयोगासाठी आणि स्वत:ला उन्नत करण्यासाठी आहे, हा साक्षात्कार त्यांना साधनेतून झाला. त्यामुळेच आपले जीवन असेपर्यंत चांगले आणि सकारात्मक कार्य करीत रहावे, असा संदेश त्यांनी केला. त्यांनी संपूर्ण देशाला धम्माच्या माध्यमातून उन्नत केले आणि धम्माचा प्रसार केला, असे मत पुणे येथील यशोसागर यांनी व्यक्त केले. दीक्षाभूमी येथे आयोजित बुद्ध महोत्सवातील रत्नावली व्याख्यानमालेत ते आचार्य पद्मसंभव विषयावर बोलत होते. आचार्य पद्मसंभव यांनी स्मशानात साधना केली. मृत्यूच्यावेळी पैसा, मित्र, नातेवाईक कुणीही कामात येत नाही तर फक्त धम्मच कामाला येतो. स्मशान हा आपल्या जीवनाचाच एक भाग आहे कारण जन्म झाला तेथे मृत्यू आहेच. त्यांनी जे ज्ञान मिळविले ते समाजाच्या कामात यावे म्हणून आचार्यांनी स्वत:ला झोकून दिले. पण लोकांसाठी काम करताना विविध भाषा आणि वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान असले पाहिजे. या ध्यासातून त्यांनी नालंदा येथे विविध विषयांचे ज्ञान मिळविले. कारण सर्वांनाच तत्त्वज्ञान कळणारे नव्हते. काम करताना त्यांना लोकांचे शारीरिक, मानसिक दु:ख दिसले. त्यावर मात करण्यासाठी आचार्यांनी वैद्यकशास्त्राचाही अभ्यास केला. संस्कृतसह अनेक भाषांमध्ये ते पारंगत झाले. भारताचे परिक्रमण करताना त्यांनी हिमालय गाठला. देश फिरताना प्रत्येक ठिकाणी त्यांनी बौद्ध धम्माचा प्रसार केला आणि धम्माची स्थापना केली. ब्राह्मण पंडितांकडून त्यांना नेहमीच आव्हाने मिळत होती. एकदा त्यांनी ५०० ब्राह्मण पंडितांचे आव्हान स्वीकारले आणि बौद्धिक चर्चेत त्यांचा पराभव केला. त्यानंतर ब्राह्मण पंडितांनी बौद्ध धम्म स्वीकारला आणि पंडितांचे आचार्य म्हणून त्यांचे नान शाक्यसिंहापासून आचार्य पद्मसंभव झाले. पूर्वी संपूर्ण काश्मीर बौद्धमय होता. हिमाचलात काम करताना त्यांना तिबेटचे आमंत्रण आले आणि त्यांनी तिबेटमध्ये बॉन धर्म जो कर्मकांडात अडकला होता त्यातून तिबेटची सुटका करून तेथे धम्म स्थापन केला. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून धम्मचारिणी विजया आणि मैत्रीसागर उपस्थित होते.
पद्मसंभव यांनी धम्मातून समाजाला उन्नत केले
By admin | Updated: January 21, 2015 00:31 IST