नागपूर : म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने यावरील औषधांचा तुटवडा पडला आहे. विशेषत: ‘अॅम्फोटेरिसिन-बी’ इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याची दखल घेत आता आरोग्य विभागामार्फत त्याची खरेदी करून सर्व जिल्ह्यांना जिल्हा शल्यचिकित्सकामार्फत पुरवठा करणे सुरू झाले. त्यानुसार शनिवारी नागपुरात ‘अॅम्फोटेरिसिन-बी लायपोसोमल’चे ६९६ व्हायल तीन शासकीय रुग्णालयांसह १९ खासगी रुग्णालयांना वाटप करण्यात आले.
मागील दोन ते तीन आठवड्यांपासून म्युकरमायकोसिसवरील औषधांचा प्रचंड तुटवडा पडल्याने रुग्णसेवाच अडचणीत आली होती. काळाबाजारात अव्वाच्या सव्वा किमतीत ही औषधे विकली जात होती. अखेर आरोग्य विभागाने याची खरेदी व वाटप प्रक्रिया हाती घेतल्याने रुग्णांनी व रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला. शनिवारी ‘अॅम्फोटेरिसिन-बी लायपोसोमल’ इंजेक्शनचे मेडिकलला ९०, मेयोला २४, शासकीय दंत रुग्णालयाला ४८, ट्रिनिटी हॉस्पिटलला ६, केअर हॉस्पिटलला १८, कानफाडे हॉस्पिटलला १२, गॅस्ट्रो हॉस्पिटलला १२, विम्स हॉस्पिटलला १८, क्रिटिकेअर हॉस्पिटलला १२, वेद क्लिनिकला १८, सिम्स हॉस्पिटलला २४, न्यू ईरा हॉस्पिटलला ६, अॅलेक्सीस हॉस्पिटलला ४२, ऑरेंज सिटी हॉस्पिटलला ४८, किंगस्वे हॉस्पिटलला ७२, सेव्हन स्टार हॉस्पिटलला १०२, न्यूरॉन हॉस्पिटलला ७२, निती क्लिनिक हॉस्पिटलला ४८, विवेका हॉस्पिटल, लता मंगेशकर हॉस्पिटल, एअर फोर्स हॉस्पिटलला व कुणाल हॉस्पिटलला प्रत्येकी सहा व्हायल देण्यात आले. खासगी रुग्णालयांनी रुग्णांच्या आवश्यकतेनुसार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात शुल्काची भरणा केल्यानंतर हे इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे.