नागपूर : कोरोनाचे प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे. शनिवारी नागपूर जिल्ह्यात १६ रुग्ण आढळून आले. समाधानकारक बाब म्हणजे, ही आकडेवारी कोरोनाच्या सुरुवातीच्या म्हणजे, मे २०२० महिन्यातील आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ८ व ग्रामीणमधील ७ रुग्ण व पुन्हा एकदा शून्य मृत्यूची नोंद झाली. मृत्यू झालेला एक रुग्ण जिल्हाबाहेरील होता. रुग्णांची एकूण संख्या ४७६७२२ तर, मृतांची संख्या ९०१७ वर पोहचली.
कोरोनाचा दुसऱ्या लाटेने आरोग्य यंत्रणेला हैराण केले होते. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले होते. मात्रा आता दिवसागणिक बाधित व मृतांची संख्या कमी होऊन कोरोनाचा पहिल्या लाटेतील सुरुवातीच्या काळातील आकडेवारी दिसून येत आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा पहिल्या रुग्णाची नोंद ११ मार्च २०२० रोजी झाली. या महिन्यात १६ रुग्ण आढळून आले होते. एप्रिल २०२०मध्ये १२३ तर मे २०२० मध्ये ३९२ रुग्णांची नोंद झाली. नंतर ही संख्या वाढत गेली. आज नागपूर जिल्ह्यात ९८०९ चाचण्या झाल्या. यात शहरात ७४९३ तर ग्रामीणमध्ये २३१६ चाचण्यांचा समावेश होता. नागपूर जिल्ह्यातून ११६ रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त होण्याचा दर ९७.९० टक्क्यांवर पोहचला असून आतापर्यंत ४६६७०३ रुग्ण बरे झाले आहेत.
-कोरोनाचे १००२ सक्रिय रुग्ण
नागपूर जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे १००२ रुग्ण सक्रिय होते. यात शहरातील ९४७ तर ग्रामीणमधील ५५ रुग्ण होते. यात ७७९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर, २२३ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
:: कोरोनाची शनिवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ९८०९
शहर : ८ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ७ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४७६७२२
ए. सक्रिय रुग्ण : १००२
ए. बरे झालेले रुग्ण : ४६६७०३
ए. मृत्यू : ९०१७