आकांक्षा कनोजिया
नागपूर : वसंत ऋतूची चाहूल लागली आहे, पानगळ सुरू झाली आहे. या काळात रस्त्यांवर पानांचा खच पडलेला दिसत असतो. सकाळी सफाई कर्मचारी रस्त्यावरील पानांचा कचरा गोळा करून आगी लावून त्याची वाट लावतात. आता महापालिका प्रशासनाने वसंत ऋतूतील पानगळीचा वापर खतनिर्मितीसाठी केला आहे. शहरातील काही रस्त्यांवर लोखंडी कठडे तयार करून त्यात रस्त्यावरील कचरा टाकला जात आहे. यापासून निर्माण होणारे खत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तर रस्त्याच्या दुभाजकांवर लावलेल्या झाडांसाठी सुद्धा या खतांचा उपयोग होणार आहे.
- दररोज ३० ते ४० टन कचऱ्यापासून खत निर्मिती
मुख्य स्वच्छता अधिकारी दीनदयाल टिंबाडे यांनी सांगितले की, पूर्वी ३ ते ४ टन कचरा खत बनविण्यासाठी भांडेवाडीत पाठविला जात होता. परंतु या उपक्रमामुळे ३० ते ४० टन कचऱ्यापासून रस्त्यावरच खताची निर्मिती केली जात आहे. पूर्वीपेक्षा जास्त कचऱ्याचा वापर या प्रक्रियेमुळे होत आहे.
- १३ ठिकाणी लागले कम्पोस्ट पिट
वाळलेली पाने गोळा करण्यासाठी शहरातील १३ ठिकाणी कम्पोस्ट पिट लावण्यात आले आहे. धरमपेठ झोन अंतर्गत सिव्हील लाईनमध्ये ५, अंबाझरीमध्ये ८ कम्पोस्ट पिट लावले आहे. जैविक खत बनविण्यासाठी साधारणत: ४० दिवसांचा कालावधी लागतो. ४० दिवसानंतर खत तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना देण्यात येईल. दीनदयाल टिंबाडे म्हणाले की रस्त्यावर पसरलेली पानगळ रोज उचलून भांडेवाडीत पाठविणे शक्य नाही. त्यामुळे शहरात जिथे जास्त वृक्ष आहे, तिथे कम्पोस्ट पिट लावून खत बनविण्यात येत आहे.
- दररोज १०० किलो खताची निर्मिती
प्रायोगिक तत्वावर १३ कम्पोस्ट पिट लावण्यात आले आहे. शहरातील कचऱ्यापासून कमी खर्चात खत निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. कम्पोस्ट पिट लावल्याने वाळलेल्या पानांपासून दररोज १०० ते १२५ किलो खत होम कम्पोस्टींग केले जात आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्टचा खर्चही वाचला आहे.
-डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त, घन कचरा व्यवस्थापन