मोरेश्वर मानापुरे
नागपूर : वर्षभरात चारदा तारीख वाढविलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता मार्चमध्ये होणार आहेत. यासंदर्भात सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे कक्ष अधिकारी अनिल चौधरी यांनी २ फेब्रुवारीला राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका तत्काळ सुरू करण्याचे नवे आदेश काढले आहेत. त्यामुळे जिल्हा सहकारी बँकांसह राज्यातील ४७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करून निवडणुका घ्यायच्या आहेत. यासंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण एक वा दोन दिवसात गाईडलाईन जारी करणार आहे.
यापूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका १८ मार्च २०२० रोजीच्या आदेशान्वये १७ जूनपर्यंत आणि १७ जून २०२० च्या आदेशान्वये १६ सप्टेंबरपर्यंत, २८ सप्टेंबरच्या आदेशान्वये ३१ डिसेंबर २०२० पर्यंत आणि त्यानंतर मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार व आदेशान्वये ३१ मार्च २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. राज्यात पार पाडलेल्या विधान परिषदांच्या निवडणुका व ग्रामपंचायतींच्या निवडणुका तसेच राज्यातील लोकप्रतिनिधी व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याच्या विनंतीवरून सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने उपरोक्त आदेश काढले आहेत.
अनेक सहकारी संस्थांची ३१ डिसेंबरला संपली मुदत
राज्यात जिल्हा सहकारी बँका, सहकारी सोसायट्या, पतसंस्थांच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात. राज्यात ४७ हजार सहकारी संस्थांपैकी बहुतांश संस्थांची मुदत ३१ डिसेंबरला संपली आहे. या सर्वांना मार्चपर्यंत निवडणुका घ्यायच्या आहेत. या संस्था आणि पतसंस्थांना मार्चअखेरपर्यंत निवडणूक घेणे शक्य आहे का, हा गंभीर मुद्दा आहे. मनुष्यबळाची उपलब्धता आणि फेब्रुवारी व मार्च महिना कर्ज वसुलीचा असल्याने संस्थांचे पदाधिकारी आदेशाने चिंतित आहेत. लहान सोसायट्या आणि पतसंस्थांचे मार्चपूर्वी आणि मोठ्यांच्या निवडणुका मार्चनंतर घ्याव्यात, असे मत सहकार तज्ज्ञांनी व्यक्त केले.
राज्यात १६ हजार पतसंस्था आणि ४९९ सहकारी बँका
राज्यात १६ हजारांपेक्षा जास्त पतसंस्था, २१,२१४ विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि ४९९ सहकारी बँका आहेत. विदर्भात ४० सहकारी बँका असून, त्यापैकी नागपुरात १६ आहेत. सहकारी पतसंस्थांमध्ये १ लाखांपेक्षा जास्त ठेवी आहेत. या सर्वांच्या निवडणुका होणार आहेत.
निवडणुकांसंदर्भात गाईडलाईन येणार
सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभागाने काढले आहेत. आता निवडणुकांसाठी एक ते दोन दिवसांत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची गाईडलाईन येण्याची शक्यता आहे. या गाईडलाईननुसार आणि उपलब्ध मनुष्यबळानुसार निवडणुकांचे टप्पे ठरतील.
अजय कडू, जिल्हा उपनिबंधक, राज्य सहकारी विभाग.
निवडणुका मार्चनंतर घ्याव्यात
निवडणुका घेण्याचे आदेश शासनाने काढले असले तरीही राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणुका मार्चनंतर घेण्याची गाईडलाईन काढावी. कारण सहकारी संस्था आणि बँकांची फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कर्ज वसुलीची प्रक्रिया सुरू असते. या निवडणुकांमुळे त्यांची धावपळ होणार आहे. त्याचा परिणाम पतसंस्था आणि बँकांच्या आर्थिक व्यवहारावर होईल. लहान पतसंस्थांच्या निवडणुका मार्चमध्ये आणि मोठ्या पतसंस्था व बँकांच्या निवडणुका मार्चनंतर घेतल्यास काहीही फरक पडणार नाही.
विवेक जुगादे, विदर्भ प्रांत महामंत्री, सहकार भारती.