शरद मिरे
भिवापूर - भिवापूर तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील काही गावे भिवापूर शहराला लागून आहेत. त्यामुळे तेथील रुग्ण तपासणी व उपचारासाठी भिवापूरला येतात. मात्र, रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास त्याला औषध न देता ‘तुम्ही तुमच्या जिल्ह्यात जा’ असे सांगत त्यांना परत पाठविले जात आहे. अशात ‘आम्हाला बेड नको, फक्त औषध द्या’ ही रुग्णांची आर्त हाक आरोग्य विभागाच्या माणूसकीवर प्रश्न चिन्ह उठविणारी आहे.
मध्यंतरी भिवापूर तालुकास्थळावरील कोविड सेंटरमध्ये तालुक्याबाहेरील व जिल्हाबाहेरील रुग्ण दाखल करून घेतल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर स्थानिक जनमानसात संताप होता. अशातच ऑक्सिजन बेड अभावी जवराबोडी येथील रुग्णाचा मृत्यू झाल्याने हा संताप अधिकच तीव्र झाला. त्यामुळे आरोग्य विभागाने आता तालुक्याबाहेरील व जिल्ह्याबाहेरील रुग्णांना स्थानिक कोविड सेंटरमध्ये प्रवेश नाकारला आहे. बेड अभावी स्थानिक रुग्णांची होणारी ससेहोलपट लक्षात घेता आरोग्य विभागाचा हा निर्णय काही अंशी योग्य असला तरी गृहविलगीकरणातील रुग्ण कुठलाही असो किमान त्याला औषध देणे आवश्यक आहे. भिवापूर वरून अवघ्या पाच ते दहा किमी अंतरावर चंद्रपूर, भंडारा जिल्ह्याच्या सीमा प्रारंभ होतात. चंद्रपूर जिल्ह्यातील साठगाव, कोलारी, शंकरपूर, चिचाळा व भंडारा जिल्ह्यातील निलज, आमगाव, भुयार, मेंढेगाव, काकेपार ही गावे भिवापूर शहराला लागून आहे. याऊलट त्यांची तालुकास्थळे २० ते ४० कि.मी. लांब आहे. त्यामुळे सदर गावातील नागरिक छोट्यामोठ्या कामासाठी भिवापूरला दररोज येतात.
कोरोना संसर्गजन्य परिस्थीतीत तपासणी व उपचारासाठी भिवापूर जवळ असल्यामुळे येथील रुग्ण भिवापूरला येत आहे. तपासणीअंती त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर ते स्थानिक कोविड सेंटर मध्ये औषधासाठी येतात. मात्र, येथील डॉक्टर त्यांना ‘तुम्ही तुमच्या तालुक्यात व जिल्ह्यात जा’ असा सल्ला देत आहेत. त्यावर 'आम्हाला बेड नको, किमान औषध तरी द्या. औषध उपलब्ध नसेल, तर किमान औषधोपचार तरी लिहून द्या. आम्ही खाजगी मेडिकलमधून औषध विकत घेऊ’ अशी विनंती हे रुग्ण करीत आहेत.
तपासणी करता, मग औषध का देत नाही?
मध्यंतरी तालुकास्थळावरील कोविड सेंटर मध्ये तालुक्या व जिल्ह्याबाहेरील रुग्ण दाखल केल्याने स्थानिक रुग्णांना बेड मिळत नव्हते. याबाबत तक्रारी झाल्या. त्यामुळे आता बाहेरच्या रुग्णांना येथे दाखल करून घेतले जात नाही. सीमावर्ती भागातील रुग्णांची तपासणी मात्र भिवापूर येथे होत आहे. त्यामुळे तपासणी येथे होत असेल तर, पॉझिटिव्ह रुग्णांना औषधी मिळणे आवश्यक आहे. स्कोअर कमी असलेले असे अनेक रुग्ण गृहविलगीकरणात असतात. त्यांना तुम्ही तुमच्या जिल्ह्यात औषधोपचार घ्या, असे म्हणणे हे कितपत योग्य आहे ?