लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : नीलगाय (राेही) अचानक राेडवर आल्याने चालकाचा वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला आणि कारने नीलगाईला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्या नीलगाईचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शिवाय, ती राेडलगत जाऊन उलटल्याने चालकही जखमी झाला. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काटाेल-नागपूर मार्गावरील चारगाव शिवारात शनिवारी (दि. १३) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
संकेत केणे, रा. पंचवटी, काटोल असे जखमी कारचालकाचे नाव आहे. ताे कुटुंबातील व्यक्तींना आणण्यासाठी एमएच-४०/सीए-१२९१ क्रमांकाच्या कारने काटाेलहून नागपूरला जात हाेता. दरम्यान, चारगाव शिवारात राेडलगत असलेली नीलगाय एकदम त्याच्या कारच्या समाेर आली. त्यामुळे त्याचा कारवरील ताबा सुटला आणि ती कार थेट नीलगाईवर धडकली. शिवाय, ती कार चार काेलांट्याउड्या घेत राेडलगत उलटली, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली.
यात गंभीर दुखापत झाल्याने नीलगाईचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कारमधील एअर बॅग धडक लागताच उघडल्या गेल्याने संकेतला गंभीर दुखापत झाली नाही, असेही जाणकार व्यक्तींनी सांगितले. माहिती मिळताच पाेलीस व वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी मृत नीलगाय ताब्यात घेत तिची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली, तर पाेलिसांनी संकेतला काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी नागपूरला रवाना करण्यात आले. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.