नागपूर : तरुण वकील अॅड. नीतू बर्वे यांचा अपघाती मृत्यू नागपूरच्या वकीलजगताला धक्का देणारा ठरला. विधानभवन चौकात भरधाव वाहनाच्या धडकेने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अलीकडेच धडपड करणाऱ्या वकील म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायचा. युग चांडक खून खटल्याच्या सुनावणी काळात त्या दिवसभर प्रधान जिल्हा न्यायाधीश किशोर सोनावणे यांच्या न्यायालयात उपस्थित असायच्या. अॅड. राजेंद्र डागा हे या प्रकरणातील फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांचे वकील होते. अर्थात सरकार पक्षाला सहाय्य, असा त्यांचा सहभाग होता आणि नीतू बर्वे या डागा यांच्या ‘ज्युनियर’ होत्या. राजेंद्र डागा यांचे वडील प्रसिद्ध विधिज्ञ हयात असताना नीतू बर्वे त्यांच्या कार्यालयात जात होत्या. २००९ पासून नीतू बर्वे या वकिली सेवेत होत्या. हल्ली त्या इन्शुरन्स पॅनलवरील वकील अॅड. डी. एन. कुकडे यांच्या कार्यालयात जायच्या. कौटुंबिक न्यायालय आणि चेक बाऊन्सची प्रकरणे त्या लढत होत्या. जिल्हा बार असोसिएशनने ‘जस्टिशिया’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. यासाठी गत महिनाभरापासून वकिलांच्या विविध स्पर्धा सुरू आहेत. महिलांच्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेत नीतू बर्वे यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावल्याने त्या ‘वूमन आॅफ दि मॅच’ घोषित झाल्या होत्या.नीतू बर्वे या अत्यंत गरीब कुटुंबातील होत्या. त्यांचे वडील मासोळी विकण्याचा छोटा व्यवसाय करतात. नीतू आणि त्यांच्या भगिनी कुटुंब सांभाळायच्या. अचानक भीषण अपघातात नीतू बर्वे यांचा मृत्यू झाल्याने या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. सायंकाळी मोक्षधाम येथे नीतू बर्वे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष आसिफ कुरेशी यांच्या अध्यक्षस्थानी पार पडलेल्या शोकसभेत डीबीएचे अध्यक्ष अॅड. प्रकाश जयस्वाल, सचिव अॅड. नितीन तेलगोटे, महाराष्ट्र बार कौन्सिलचे माजी उपाध्यक्ष अॅड. अनिल गोवारदीपे, डीबीएचे माजी अध्यक्ष अॅड. सुदीप जयस्वाल, जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे आदींनी श्रद्धांजली वाहिली. (प्रतिनिधी)
नीतू बर्वे झाल्या होत्या ‘वूमन आॅफ दि मॅच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 02:59 IST