लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : शहरासह तालुक्यात काेराेना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात एक काेविड केअर सेंटर असले तरी तिथे प्रभावी उपचार व सुविधा पुरविल्या जात नाही, असा आराेप काही रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे कळमेश्वर शहरातील ग्रामीण रुग्णालयात सुसज्ज काेविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरासह तालुक्यात राेज सरासरी १०० काेराेनाबाधितांची भर पडत आहे. यातील १० ते १५ रुग्णांना राेज नागपूरला उपचारासाठी पाठवावे लागते. शहरात एक काेविड केअर सेंटर असले तरी त्याचा उपयाेग विलगीकरण कक्ष म्हणून केला जाताे. या काेविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनसह उपचाराची साेय करण्यात आली आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत असून, तालुक्यात उपचाराची साेय नसल्याने रुग्णांना नागपूरला पाठविण्यावाचून गत्यंतर नाही. नागपूर शहरातील शासकीय काेविड केअर सेंटरमध्ये आधीच खाटांची कमतरता असून, तिथे शहरासह जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरील रुग्ण येत असल्याने खाटा मिळणे कठीण जात आहे. त्यामुळे उपचारातील दिरंगाई रुग्णांसाठी प्राणघातक ठरू शकते.
वास्तवात टेस्ट केल्यानंतर दाेन दिवसांनी त्याचा रिपाेर्ट दिला जाताे. हा रिपाेर्ट प्राप्त हाेईपर्यंत रुग्णांवर प्रतिबंधात्मक औषधाेपचारही केला जात नाही. त्यामुळे या आजाराची तीव्रता वाढत जाते. तालुक्याची लाेकसंख्या १ लाख २० हजार असून, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, एकमेव काेविड केअर सेंटर सुविधा पुरविण्यास सक्षम नाही. कळमेश्वर शहरातील ग्रामीण रुग्णालय अद्ययावत आहे. या ठिकाणी व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची साेय केल्यास रुग्णांवर स्थानिक पातळीवर उपचार करणे सहज शक्य हाेईल. शासकीय रुग्णालयात खाटा मिळत नसल्याने, खासगी हाॅस्पिटलमध्ये गर्दी वाढली आहे. यात रुग्णांची आर्थिक लूट हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. गरीब रुग्णांना खासगी हाॅस्पिटलमधील महागडे उपचार घेणे शक्य नाही. त्यामुळे कळमेश्वर शहरातील ग्रामीण रुग्णालयात काेविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
....
एकमेव सेंटर
कळमेश्वर शहरातील शासकीय मागासवर्गीय मुलीच्या वसतिगृहात शासनाने काेविड केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये १०० खाटांची व ऑक्सिजनच्या चार सिलिंडरची व्यवस्था करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये काेराेना संक्रमित रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जातात. वास्तवात कळमेश्वर शहरासह तालुक्यात सध्या राेज सरासरी १०० रुग्णांची भर पडत असून, यात काही गंभीर रुग्णही असतात. त्यांना उपचारासाठी नागपूरला पाठवावे लागते. नागपूर शहरातील शासकीय काेविड सेंटरमध्ये आधीच खाटांची कमतरता असल्याने, ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसाेय हाेते. शहरात सुसज्ज काेविड केअर सेंटर सुरू केल्यास नागपुरातील काेविड केअर सेंटरवरील रुग्णांचा ताण कमी हाेईल व स्थानिक रुग्णांचा चांगली सेवा मिळून त्यांचे प्राण वाचविणे शक्य हाेईल.
...
फिरण्याला ‘ब्रेक’ लावा
सध्या कळमेश्वर शहरात काेराेना रुग्णांवर प्रथमाेपचार करून नागपूरला पाठविण्याचा एककलमी कार्यक्रम राबविला जात आहे. काही रुग्णांना घरीच विलगीकरण कक्षात राहण्याचा सल्ला दिला जाताे. यातील बहुतांश रुग्ण नियमांची पायमल्ली करीत मनसाेक्त फिरत असतात, शिवाय ते त्यांच्या कुटुंबीयांसह इतरांच्याही सतत संपर्कात येतात. त्यांच्या या फिरण्याला ‘ब्रेक’ लावण्याची तसदी स्थानिक प्रशासन व त्यांचे कुटुंबीय घेत नाही. त्यामुळे संक्रमणात वाढ हाेत असल्याने, त्यांच्या फिरण्याला ‘ब्रेक’ लावणे गरजेचे आहे.
...
ग्रामीण रुग्णालय हे नाॅन कोविड सेंटर आहे. आम्हाला या रुग्णालयात कोविड रुग्णांना ठेवण्याच्या कोणतीही गाईडलाईन मिळाल्या नाहीत. परंतु आम्ही कोविड रुग्णावर प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्यास नागपूरला उपचारासाठी पाठवताे. नागपूरची व्यवस्था हाेईपर्यंत रुग्णाला ऑक्सिजनदेखील लावताे. प्रकृती गंभीर नसल्यास औषधाेपचार करून रुग्णाला गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला देताे. आमच्याकडे ऑक्सिजनचे आठ सिलिंडर असून, व्हेंटिलेटरची साेय नाही.
- डाॅ. कांचन वीरखेडे, वैद्यकीय अधिकारी,
ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर.