पोलिसांनी विरोधकांना ताब्यात घेतले : नाटक सुरळीत सुरूनागपूर : ‘मी नाथूराम गोडसे बोलतोय’ या वादग्रस्त नाटकाच्या प्रयोगाला विरोध करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी वसंतराव देशपांडे सभागृहासमोर तीव्र निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी तेथे लावलेले नाटकाचे पोस्टरही फाडले. मात्र पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर नाटकाचा प्रयोग ठरल्याप्रमाणे सुरळीत झाला.शुक्रवारी देशपांडे सभागृहात ‘मी नाथूराम...’नाटकाचा पहिला प्रयोग होता. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसेबाबत असल्याने हे नाटक आधीच वादाच्या भोवऱ्यात आहे. यामुळे प्रयोगाला विरोध होईल, अशी शक्यता लक्षात घेता पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी या नाटकाचा प्रयोग होत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सलील देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येथे पोहचून विरोध प्रदर्शन सुरू केले. त्यांनी ‘महात्मा गांधी जिंदाबाद व नाथूराम गोडसे मुर्दाबाद’ अशी नारेबाजी करीत नाटक बंद करण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्त्यांनी नाटकाच्या पोस्टरकडे धाव घेत दोन्ही पोस्टर फाडले. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र आधीच तैनात असलेल्या पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनात अनिल अहिरकर, ईश्वर बाळबुंधे, नुतन रेवतकर, दिनकर वानखेडे, विशाल खांडेकर, आशिष नाईक, विनोद हेडाऊ, शैलेश पांडे, गणेश हूड, वसीम पटेल, राहुल पांडे, जगदीश पंचबुधे, रोशन भिमटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.हा सर्व प्रकार आटोक्यात आल्यानंतर कडक पोलीस संरक्षणात नाटकाचा प्रयोग सुखरूप पार पडला. (प्रतिनिधी)‘राष्ट्रपित्याची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्याचे काम काही संघटनांकडून केल्या जात आहेत. याच अंतर्गत मजबूत राजकीय पाठिंब्याने या वादग्रस्त नाटकाचा प्रयोग होत आहे. मी नाथूराम गोडसे बोलतो हे नाटक लोकांना दाखवून गांधी वाईट होते आणि गोडसे देशभक्त होता, असे दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. गोडसेने गांधीजींची हत्या केली नसून त्यांचा वध केला हे ठसविण्याचे काम केले जात आहे. याहीपुढे जाऊन गोडसेची मंदिरे व पुतळे उभारण्याची या देशविघातक शक्तींची इच्छा असल्याचे दिसते.-सलील देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस.गोडसेने म. गांधीचा कधीच अवमान केला नाही : अभिनेता शरद पोंक्षे नाथुराम गोडसे यांनीच त्यांच्यावर खटला चालू असताना वध आणि हत्या यातील भेद न्यायालयात स्पष्ट केला होता. म. गांधींचा त्यांनी वध केला, ही भूमिका त्यांना स्वत:लाही गुन्हेगारीचीच वाटत होती. त्यासाठी त्यांनी स्वत:साठीच फाशीही निर्धारीत केली होती. म्हणूनच न्यायालयात त्यांनी स्वत:साठी कुठलाही वकील नेमण्यास विरोध दशर््विला होता. हा खटला चालू असताना नाथुरामांनी कधीही म. गांधी यांच्याबाबत अवमानजनक विधान केले नाही पण त्यांच्या भूमिकेचे समर्थन त्यांनी केले. त्याचा तपशील आणि कागदपत्रे आजही न्यायालयात उपलब्ध आहेत, असे मत अभिनेता शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. ‘मी नाथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाच्या प्रयोगासाठी ते नागपुरात आले असताना त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते. प्रदीप दळवी लिखित आणि स्व. विनय आपटे दिग्दर्शित हे नाटक माऊली प्रॉडक्शनच्या उदय धुरत यांनी रंगभूमीवर आणले तेव्हा चिथावणीखोर भाषेत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. तो आजही आहेच.
राष्ट्रवादीने फाडले ‘नाथूराम’चे पोस्टर
By admin | Updated: August 8, 2015 03:02 IST