हेमंत पांडे : ‘इन्स्पायर’मध्ये विद्यार्थ्यांसमोर उलगडले सत्यनागपूर : समाजातील अनेक व्यक्तींकडून हवेतून आग निर्माण करणे, एखाद्या दगडाचा क्षणात चुरा करणे असे चमत्कार दाखविण्यात येतात. प्रत्यक्षात हा अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रकार असतो व विज्ञानातील रासायनिक प्रयोगांना चमत्काराचे नाव देण्यात येते अशी माहिती हिस्लॉप महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.हेमंत पांडे यांनी दिली. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे प्रायोजित व शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘इन्स्पायर’ या विज्ञान शिबिरात त्यांंनी गुरुवारी विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसमोर या चमत्कारांचे प्रात्यक्षिकच सादर केले व यामागील विज्ञान समजावून सांगितले. यावेळी त्यांनी अनेक गमतीदार उदाहरणेदेखील दिली. दुसऱ्या सत्रात पुणे विद्यापीठाच्या ‘नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स’चे संचालक डॉ.शेखर मांडे यांनी ‘मॉलिक्युलर स्ट्रक्चर’वर प्रकाश टाकला. त्यांनी पेनिसीलीनची संरचना, त्याचा शोध व उपयोग याची माहिती दिली. तसेच सिकलसेल, अॅनिमिया यासारख्या रोगांबाबतदेखील माहिती दिली. गुणसूत्रे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशी संक्रमित होतात याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. सत्राचे संचालक अनुपमा ब्राह्मणकर यांनी केले. बुधवारी विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात आले. यात अमरावतीच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला तर भवन्स बी.पी.विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज, श्रीकृष्णपेठ व कमला नेहरू महाविद्यालय, नागपूर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. सायंकाळी सर्व विद्यार्थ्यांनी रमण विज्ञान केंद्राला भेट दिली. (प्रतिनिधी)
रासायानिक प्रयोगांना देतात चमत्काराचे नाव
By admin | Updated: January 16, 2015 00:58 IST