जीवन रामावत - नागपूर
शासकीय अधिकारी व कर्मचार्यांवर नियंत्रण राहावे. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता यावी. यासाठी प्रत्येक तीन वर्षांनंतर बदल्यांचा नियम घालून देण्यात आला आहे. मात्र काही अधिकारी व कर्मचार्यांनी ‘पूल’ च्या नावाखाली यातून वेगळा मार्ग शोधला आहे. वास्तविक शासनाने कार्यालयीन कामाच्या सोयीसाठी प्रतिनियुक्तीचा (पूल) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. पण काही अधिकारी व कर्मचारी त्याचा गैरफायदा घेऊ न सोयीच्या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यात आघाडीवर दिसून येत आहे. येथील सुमारे सहा ते सात अधिकारी व कर्मचारी गत १० ते १५ वर्षांपासून ‘पूल’ च्या नावाखाली एकाच खुर्चीवर कब्जा करून बसले आहेत. माहिती सूत्रानुसार या कर्मचार्यांमध्ये कृषी पर्यवेक्षक अनंत बेलूरकर, कृषी सहायक सुदेशना नागपूरकर, अनुरेखक जयप्रकाश कामडी, प्रकाश भांडारकर, कृषी पर्यवेक्षक स्मिता मून, व तंत्र अधिकारी हरिभाऊ महाजन यांचा समावेश आहेत. यापैकी अनंत बेलूरकर यांचे मुख्यालय हिंगणा येथे आहे. मात्र ते गत १२ ते १५ वर्षांपासून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बसून आहे. सुदेशना नागपूरकर या ५ ते ७ वर्षांपासून, जयप्रकाश कामडी ४ ते ५ वर्षांपासून, प्रकाश भांडारकर ७ ते ८ वर्षांपासून स्मिता मून २ ते ३ वर्षांपासून व महाजन यांनी गत सहा महिन्यांपासून येथे ठाण मांडले आहे. विशेष म्हणजे, एकाच ठिकाणी एवढ्या वर्षापासून कार्यरत असल्याने या सर्व कर्मचार्यांची येथे एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. यापैकी काही अधिकारी व कर्मचारी कार्यालात कधी येतात व कधी जातात, याची कुणी दखलही घेत नसल्याची माहिती आहे. कदाचित यामुळेच आजपर्यंत त्यांना कुणी मुख्यालयी परत पाठविण्याची हिंमत दाखविली नाही. संबंधित अधिकारी व कर्मचार्यांपैकी प्रत्येकजण सोयीच्या खुर्चीवर बसला आहे. त्यामुळेच तो ती खुर्ची सोडण्यास तयार नसल्याची चर्चा आहे.