लाचप्रकरण : रायटरला जामीननागपूर : अडीच लाखांच्या लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे प्रभारी विशेष न्यायाधीश शेखर मुळे यांच्या न्यायालयाने आज आरोपी सदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण माळी यांचा पोलीस कोठडी रिमांड दोन दिवस स्थगित केला तर त्यांचा रायटर मनोहर निमजे याची जामिनावर सुटका केली. अवस्थीनगर येथील डेव्हलपर व बिल्डर शकीलबाबू वल्द छोटू साहाब यांच्या तक्रारीवरून शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मनोहर निमजे याला पोलीस निरीक्षक अरुण माळी यांच्या वतीने अडीच लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली होती. रविवारी या दोघांनाही पोलीस कोठडी रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांनाही दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. पोलीस कोठडी रिमांड आदेशानंतर माळी आणि निमजे यांना न्यायालय कक्षाच्या बाहेर आणण्यात आले असता किन्नर आणि विदर्भवाद्यांनी माळी यांच्यावर हल्ला करून त्यांच्या तोंडाला शाई फासली होती. दरम्यान पोलीस कोठडी रिमांडमध्ये असतानाच काल माळी यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी मेडिकल कॉलेज इस्पितळात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना भरती करून घेतले आणि अतिदक्षता विभागात ठेवले. आज या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांनी आरोपी अरुण माळी यांना काल रात्री इस्पितळात दाखल करण्यात आल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने आरोपी माळी यांचा पोलीस कोठडी रिमांड दोन दिवसपर्यंत स्थगित केला. माळी यांना दोन दिवसात सुटी झाल्यास त्यांना न्यायालयात हजर केले जाईल, सुटी न मिळाल्यास त्यांचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात दाखल केला जाणार आहे. दरम्यान तपास अधिकाऱ्याने मनोहर निमजे याला न्यायालयात हजर करून आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मंजूर करताच त्याच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला. तो न्यायालयाने मंजूर केला. न्यायालयात सरकारच्या वतीने विशेष सरकारी गिरीश दुबे यांनी तर आरोपीच्या वतीने अॅड. कुरेशी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
माळीचा पीसीआर दोन दिवस स्थगित
By admin | Updated: June 11, 2014 01:07 IST