रसिकाग्रणी बाबासाहेब उत्तरवार सहस्रचंद्रदर्शन सोहळानागपूर : मुंबईचे सुप्रसिद्ध गायक माधव आणि सुचित्रा भागवत यांच्या सुमधुर गायनाने शीतलहरींची सायंकाळ संस्मरणीय ठरली. संगीत रसिकाग्रणी बाबासाहेब उत्तरवार यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त या हिंदी-मराठी गझलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माधव आणि सुचित्रा भागवत यांच्या सादरीकरणाने ही मैफिल रंगतदार झाली. याप्रसंगी गोपालदास श्राफ, सूरमणी पं. प्रभाकर धाकडे, ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख, गायक माधव भागवत, बाबासाहेब उत्तरवार, प्रा. अरविंद देशमुख, कवी बळवंत लामकाणे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी उदयोन्मुख प्रतिभावंत गायिका रेणुका इंदूरकर हिने ‘का करु सजनी आए न बालम...’ ही ठुमरी आणि संत मीराबाईचे भजन ‘ओ मारो बाला गिरधारी..’ सुरेल स्वरात सादर करून उपस्थितांची दाद घेतली. त्यानंतर माधव आणि सुचित्रा भागवत यांच्या हिंदी-मराठी गझल व गीतांनी उपस्थितांच्या मनाचा ताबा घेतला. कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या वेचक गझलांचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सादर करणाऱ्या या कलावंत दाम्पत्याच्या भावपूर्ण गायनाने श्रोत्यांना एक वेगळी अनुभूती लाभली. सुरेश भट यांच्या ‘मनाप्रमाणे जगावयाचे किती, किती छान बेत होते, कुठेतरी दैव नेत होते’ ही गझल माधव भागवत यांनी सादर केली. त्यांच्या पहिल्याच गझलने रसिकांना आनंद दिला. यानंतर हळव्या स्वरानुबंधाच्या ‘नुसतेच बहाणे होते, नुसतेच खुलासे होते, कोरड्या तुझ्या शब्दांचे कोरडे दिलासे होते..., आज का तुला माझे एवढे रडे आले.., कल चौदविकी रात थी..., रंजिश ही सही..., तुझा हात मी प्रेमाने जरासा दाबला होता... जिंदगी मे तो सभी प्यार किया करते है..’ आदी दिलखूश गझलांनी कार्यक्रमात रंगत आणली. सुचित्रा यांनी ‘मी मज हरपून.., केव्हातरी पहाटे, सहज सख्या एकदा येई सांजवेळी, आज जाने की जिद ना करो..., तु नभातले तारे माळलेस का तेव्हा.., मागे उभा मंगेश’ आदी गीत, गझलने समाँ बांधला. कार्यक्रमात सूरमणी पं. प्रभाकरराव धाकडे यांची व्हायोलिन संगत होती. जनार्दन लाडसे आणि संजय इंदूरकर यांनी तबला व संवादिनीवर साथ दिली. निवेदन अरविंद देशमुख यांनी तर आभार विवेक घवघवे यांनी मानले. प्रमिला उत्तरवार, अनिल, रागिणी, जितेंद्र उत्तरवार, जयश्री मुळीक यांनी कलावंतांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)