मोठे रॅकेट सक्रिय : बेरोजगार तरुणांची खुलेआम फसवणूक नागपूर : वन विभागाच्या पाठोपाठ आता वीज वितरण कंपनी महावितरणमध्येही नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सोमवारी दुपारी एक तरुण व तरुणी थेट हातात नियुक्तीपत्र घेऊन उच्चस्तर लिपिक पदावर रुजू होण्यासाठी महावितरणच्या नागपूर कार्यालयात पोहोचले असता या प्रकरणाचा भंडाफोड झाला. विशेष म्हणजे, नुकत्याच चार दिवसांपूर्वी वन विभागातही बोगस वेबसाईट तयार करू न, अशीच एक घटना उघडकीस आली आहे. माहिती सूत्रानुसार, महावितरणमधील नोकरीच्या नावाखाली फसवणूक करण्यात आलेले दोघेही तरुण-तरुणी भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते सोमवारी दुपारी त्या नियुक्तीपत्रासह महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहोचले. परंतु त्या अधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्र पाहताच ते बोगस असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी त्या तरुण-तरुणीची सखोल चौकशी करू न त्यांना ते नियुक्तीपत्र कुणी दिले, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काही लोकांनी त्यांच्याकडून लाखो रुपये हडप करू न ते बोगस नियुक्तीपत्र दिल्याचे त्या तरुणाने सांगितले. महावितरण कंपनीचा लोगो असलेल्या त्या नियुक्तीपत्रावर दोनच उमेदवारांची नावे होती. मात्र या संपूर्ण प्रकरणात सुमारे १० ते १२ तरुणांची फसवणूक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. महावितरणच्या एका अधिकाऱ्यांच्या मते, त्या बोगस नियुक्तीपत्रावर ‘पोस्टेड बँ्रच कामठी’ असा उल्लेख करण्यात आला होता. परंतु महावितरणच्या कोणत्याही नियुक्तीपत्रावर ‘ब्रँच’ असा उल्लेख केला जात नाही. (प्रतिनिधी)आमिषाला बळी पडू नका यासंबंधी महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांनी महावितरण या संपूर्ण प्रकरणाची लवकरच सखोल चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले. परंतु यासोबतच तरुणांनीही नोकरीच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. महावितरणमध्ये थेट नोकर भरतीसाठी सुनियोजित प्रक्रिया राबविली जाते. त्यानुसार सर्वप्रथम जाहिरात प्रकाशित करू न आॅनलाईन अर्ज मागविण्यात येते. त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखती घेऊन नियुक्ती केल्या जात असल्याचे ते म्हणाले.
महावितरणचे बोगस नियुक्तीपत्र!
By admin | Updated: July 28, 2015 03:53 IST