स्वरधारा बरसल्या : हिंदी-मराठी गीतांनी श्रोते चिंबनागपूर : खास कोरसमुळे लोकप्रिय झालेल्या हिंदी-मराठी गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते स्वरवेध व रोटरी क्लब आॅफ नागपूर ग्रीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे. हा कार्यक्रम डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आज, सोमवारी सायंकाळी पार पडला.गीत-संगीताचे कार्यक्रम नेहमीच होत असतात. परंतु, कोरसला केंद्रबिंदू ठरवून झालेला हा नागपुरातील हा बहुदा पहिलाच कार्यक्रम होय. या कार्यक्रमात कोरसची जादू चालली हे श्रोत्यांच्या उत्साहाने सिद्ध केले. कार्यक्रमाचे नावही होते ‘जादू कोरस का’. उपराजधानीवासियांना अभिमान असलेले गायक अनिरुद्ध जोशी, निरंजन बोबडे, रसिका चाटी, डॉ. शीला कुलकर्णी व श्रीनिधी घटाटे यांनी विविध श्रवणीय गीतांनी श्रोत्यांना चिंब केले. कोरस गायकांमध्ये कैवल्य केजकर, श्रेया खराबे, शुभम राजपुरे, भक्ती मराठे, प्रशांत जोग, गौरी गायकवाड, अमृत चन्नेवार, शरयू राऊत, प्रियंका चौधरी व धनश्री पुराणिक यांचा समावेश होता. ऐ मालिक तेरे बंदे हम... गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर घनघन माला नभी..., प्यार किया तो डरना क्या..., मेरे देशकी धरती..., भोर आई गया अंधियारा..., तेरी मैफिल मे किस्मत..., घनन घनन घन..., चढता सूरज..., ग साजनी..., ऋतू हिरवा..., अखिया भुल गई..., काहे छेड छेड..., पग घुंगरू बांध... अशी एकापेक्षा एक सरस गीते सादर करण्यात आली. परदा है परदा... गीतासाठी श्रोत्यांनी वन्स मोअरचा आग्रह धरला. अनिरुद्धनही श्रोत्यांचा मान राखला. कार्यक्रमाची संकल्पना अॅड. भानुदास कुलकर्णी यांची होती. श्वेता शेलगावकर यांच्या निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढविली. सचिन बक्षी, अॅड. भानुदास कुलकर्णी, अरविंद गडीकर, अक्षय आचार्य, अरविंद उपाध्ये, प्रसन्न वानखेडे, पंकज यादव व सुभाष वानखेडे यांनी विविध वाद्यांवर साथसंगत केली.(प्रतिनिधी)
कोरसची जादू चालली
By admin | Updated: August 19, 2014 00:58 IST