लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : माैदा शहरातील शासकीय रुग्णालयाला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला असून, त्याअनुषंगाने साधनांची उपलब्धता आणि कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली. या ग्रामीण रुग्णालयात काेराेना टेस्टची साेय करण्यात आल्याने, येथे राेज १५० ते २०० नागरिक टेस्टसाठी येतात. मात्र, यातील ५० ते ६० नागरिकांच्याच टेस्ट केल्या जात असून, उर्वरित नागरिकांना घरी परत जावे लागते. या रुग्णालयातील मंदावलेल्या टेस्टला गती देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
माैदा येथील ग्रामीण रुग्णालयात काेराेनाच्या आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टिजेन टेस्टची साेय करण्यात आली आहे. या रुग्णालयात राेज किमान १५० ते २०० नागरिक त्यांची आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करायला येतात. आरटीपीसीआर टेस्टचा रिपाेर्ट मिळण्यास तीन ते चार दिवस लागत असून, तुलनेत ॲन्टिजेन टेस्टचा रिपाेर्ट लवकर मिळत असल्याने नागरिक या टेस्टला प्राधान्य देतात.
मात्र, या रुग्णालयात दाेन्ही टेस्ट करण्यास विलंब केला जात असून, सुरुवातीच्या ५० ते ६० रुग्णांची टेस्ट केली जाते. त्यानंतर उर्वरित नागरिकांना दुसऱ्या दिवशी टेस्ट करण्यासाठी बाेलावले जाते. या नागरिकांमध्ये कुणी पाॅझिटिव्ह असल्यास त्याच्या संपर्कात येणारा निगेटिव्ह व्यक्तीही पाॅझिटिव्ह हाेण्याची व संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे टेस्टसाठी येणाऱ्या नागरिकांची तातडीने रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केल्यास संक्रमित रुग्णावर उपचाराला लवकर सुरुवात हाेणार असून, संक्रमण कमी करण्यास मदत हाेईल. त्यामुळे या टेस्टचे प्रमाण वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
...
रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे प्रमाण वाढविण्याची आपण ग्रामीण रुग्णालय व्यवस्थापनाला सूचना केली आहे. परंतु ते वाढवायला तयार नाहीत. माैदा शहरातील औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत काेविड केअर सेंटर तयार केले असून, तिथे २० रुग्णांची ऑक्सिजन साेय केली आहे.
- प्रशांत सांगडे,
तहसीलदार, माैदा.
...
या ग्रामीण रुग्णालयात सात डॉक्टर असून, एकही डॉक्टर काेराेना रुग्णांना सेवा द्यायला तयार नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अधिकारी जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. रोज ५० ते ६० आरटीपीसीआर टेस्ट केली जाते. रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट वाढविण्यात येईल.
- डाॅ. उत्तम पाटील, वैद्यकीय अधीक्षक,
ग्रामीण रुग्णालय, माैदा.