नागपूर : मित्रांनो, आज बारावीचा निकाल. लोक म्हणतात की आयुष्याच्या वळणावरची एक अतिशय महत्त्वाची ही परीक्षा आहे. आजकाल परीक्षा म्हणजे एक प्रकारची शर्यत झाली आहे. गुणांच्या शर्यतीत कुठे ढेपाळले किंवा अपयशाचा धक्का लागला तर मन सैरभैर होण्याची भीती असते. त्यातूनच जर हा धक्का सहन करू शकले नाही किंवा सभोवतालच्या परिस्थितीतून तणाव वाढला तर काही मंडळी आपले आयुष्य संपवायला निघतात. मात्र विचार करा की ज्या व्यक्तीमध्ये स्वत:चा अनमोल असा जीव देण्याची हिंमत असू शकते, त्याने ती हिंमत जर जगण्याच्या व कामाच्या बाबतीत दाखवली तर तो कुठच्या कुठे निघून जाऊ शकतो. केवळ एका परीक्षेतील अपयश तुमच्यातील कर्तृत्वाला तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही आणि लक्षात ठेवा की स्पर्धेत दुसरा हारतो म्हणूनच पहिला जिंकतो. तर विद्यार्थ्यांंंनो आजच्या परीक्षेत अपयश आले तरी स्वत:वरील विश्वास सोडू नका . आयुष्य अनमोल आहे विद्यार्थ्यांंंनो तुमचा जीव हा सर्वांंंसाठीच फार अनमोल आहे. आजपर्यंंंत असे अनेक महान पुरुष झालेत ज्यांना अभ्यासात तर अपयश आले होते, मात्र आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी जगाला नवीन मार्ग दाखविला. जर मनात आत्महत्येचा विचार आला तर आपल्या आई-वडिलांचा विचार करा. आत्महत्या करणे हे कुठल्याही समस्येचे उत्तर असू शकत नाही. ते पळपुट्यांचे काम आहे. तुम्ही अपयशाच्या राखेतून उठून फिनिक्स पक्ष्यासारखी उंच भरारी घ्या. (प्रतिनिधी)
आयुष्य सुंदर आहे : अपयश आल्यास नव्याने सुरुवात करा
By admin | Updated: June 2, 2014 02:21 IST