वाहतूक पोलिसांची कारवाई : तर कशी लागणार शिस्त?नागपूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६२३ वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. वाहन चालकांच्या बेशिस्तीमुळे शहरात वाहतूक व्यवस्था कशी विस्कळीत झाली आहे, याकडे लोकमतने लक्ष वेधताच ही कारवाई करण्यात आली, हे विशेष. नागपूर शहर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहनांची संख्याही वाढत आहे. येथील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र वाहतूक शाखा आहे. शहरात ५०० पेक्षा जास्त चौक आहेत. यापैकी १४३ चौकात वाहतूक सिग्नल आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी आणि अपघात होऊ नयेत, यासाठी या सिग्नलचा वापर केला जातो. परंतु गेल्या काही वर्षांपासून वाहन चालकांची बेशिस्त वाढली आहे. यामुळे गेल्या ११ महिन्यात ५०० पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. यात २१९ जणांचा जीव गेला आहे. तरीही वाहन चालक शिस्तीने वागायला तयार नाहीत. वाहतूक पोलीसही आपले काम सोडून भलत्याच कामात व्यस्त असल्याने येथील वाहतूक व्यवस्था सुधारणार तरी कशी, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने २६ नोव्हेंबरच्या अंकात ‘जीवघेणी बेशिस्त’ या शिर्षकांतर्गत वाहन चालकांच्या बेशिस्त वर्तनावर प्रकाश टाकला होता. पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) भरत तांगडे यांनी लोकमतने केलेल्या ‘जागर’ची तातडीने दखल घेत वाहतूक व्यवस्था सुदृढ करण्याच्या उद्देशाने सर्व वाहतूक कर्मचारी व अधिकाऱ्यांना निर्देश जारी केले होते. त्यानुसार बुधवारी दिवसभरात तब्बल ६२३ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर ८१ हजार ९०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच ७०४ वाहन चालकांकडून तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. (प्रतिनिधी)
६२३ बेशिस्त वाहन चालकांना धडा
By admin | Updated: November 27, 2014 00:20 IST