एलबीटी भरलाच नाही : एका कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला मालनागपूर : एका कोल्ड स्टोरेजमध्ये १२८४ व्यापाऱ्यांनी माल ठेवला आहे. संबंधित व्यापाऱ्यांना एलबीटी (स्थानिक संस्था कर ) विभागाने नोटीस ‘एन’ जारी करीत माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी व्यापाऱ्यांना एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. संबंधित मुदत लवकरच पूर्ण होणार असून त्यानंतर व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. कर संकलन समितीचे सभापती गिरीश देशमुख यांनी बुधवारी एलबीटीचा आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कळमना मार्केट येथे वाधवानी यांचे कोल्ड स्टोरेज आहे. एलबीटी विभागाने या कोल्ड स्टोरेजमधील आवश्यक दस्तावेज जप्त केले होते. त्यावरून येथे माल ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांची माहिती समोर आली. एलबीटी वसुलीला गती देण्याच्या उद्देशाने १०३ ठिकाणी तपासणी करण्यात आली. यापैकी काही ठिकाणी सील ठोकण्यात आले. १३ व्यापाऱ्यांकडून २१ लाख रुपये वसूल करण्यात आले. ७९ प्रकरणात सुनावणी घेण्यात आली. संबंधितांवर पाच कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यापैकी ट्राई स्टार कंपनीवर सर्वाधिक ४.३० कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. संबंधित कंपनीकडून दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एलबीटीपासून आजवर २७२ कोटी रुपये वसूल झाले आहेत. रहदारी व मुद्रांक शुल्कापासून ४८ कोटी रुपये मिळाले आहेत. मुद्रांक शुल्कांतर्गत वसूल करण्यात आलेल्या ३९.६४ कोटी रुपयांच्या एलबीटीपैकी राज्य सरकारने २५.६२ कोटी रुपये महापालिकेला दिले आहेत. (प्रतिनिधी) मालमत्ता करापासून मिळाले १३६ कोटीयावर्षी आजवर मालमत्ता करापासून १३६.२० कोटी रुपयांची वसुली झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी २२.५२ कोटींची अधिक वसुली झाली आहे. यावर्षी २५० कोटींचे लक्ष्य आहे. मार्चपर्यंत हे लक्ष्य गाठले जाईल, असा दावा देशमुख यांनी केला. शासकीय मालमत्तांवर ४३ कोटी थकीत शासकीय मालमत्तांवर ४३ कोटी रुपये मालमत्ता कर थकीत आहे. संबंधित कर त्वरित वसूल करण्याचे निर्देश सभापती देशमुख यांनी बैठकीत दिले. अधिकाऱ्यांनी व्यक्तिश: याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
१२८४ व्यापाऱ्यांना एलबीटी नोटीस
By admin | Updated: January 15, 2015 00:56 IST