पोलीस अधिकाऱ्याला उडविण्याचा कट : मोका किंवा एमपीडीएअंतर्गत कारवाईची शक्यताअरुण महाजन - खापरखेडारेतीचोरी आणि कन्हान पोलीस ठाण्याचे प्रभागी ठाणेदार तथा प्रोबेशनरी आयपीएस आॅफिसर गौरव सिंह यांना उडविण्याच्या कट रचल्याप्रकरणी रेतीमाफिया लतिफ अन्सारी यास पारशिवनी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तायडे यांच्या न्यायालयाने दोन दिवसांची (बुधवारपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. पारशिवनी पोलिसांनी लतिफची सात दिवसांची पोलीस कोठडी (पीसीआर) मागितली होती. लतिफच्या विरोधात मोका किंवा ‘एमपीडीए’ या कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत महसूल व पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी दिले आहे. वलनी, रोहणा, पारडी रेतीघाटात अवैध उत्खनन करून रेतीची चोरी करणे तसेच गौरव सिंह यांच्या वाहनाला टिप्परने धडक देत त्यांना उडविण्याचा कट रचल्याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी लतिफला सोमवारी दुपारी त्याच्या वलनी येथील घरून ताब्यात घेतले आणि पारशिवनी पोलिसांच्या ताब्यात दिले. सोमवारी रात्री त्याला पारशिवनी पोलीस ठाण्यात भादंवि ३०७ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली. रात्री उशिरा त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. मंगळवारी सकाळी त्याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तायडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी युक्तिवाद करीत लतिफची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने केवळ दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी अन्य २६ जणांवर गुन्हे नोंदविण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले. रेतीघाटातून पळून गेलेले चार ट्रक पकडण्यात पोलिसांना यश आले. यातील अवैध रेती वाहतुकीचे १३ ट्रक आणि एक पोकलॅण्ड मशीन बेपत्ता असून, पोलीस शोध घेत आहेत. रेतीचोरी, लुटमार, खून, हाणामारी यासह अन्य गंभीर गुन्ह्यांमध्ये लतिफचा अप्रत्यक्ष सहभाग आहे. वलनी येथील अन्वर सिद्दिकी हत्याकांडाचा लतिफ हा सूत्रधार होता. हत्याकांडानंतर संतप्त जमावाने चार मोटरसायकलींसह पोलिसांचे वाहन पेटविले होते. पोलिसांनाही मारहाण करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणातून पुराव्याअभावी त्याची निर्दोष सुटका करण्यात आली. यातून निर्माण झालेल्या दहशतीचा लतिफने पुरेपूर फायदा घेतला आणि संपूर्ण लक्ष रेतीचोरीवर केंद्रीत केले. याच दहशतीच्या जोरावर लतिफने आजवर वलनी रेतीघाटात कुणालाही रेती उत्खननासाठी शिरू दिले नाही. प्रसंगी त्याने त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आलेल्या महसूल अधिकाऱ्यांवर सशस्त्र हल्ले केले. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी लतिफला तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, या काळात त्याच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद नसल्याने या प्रस्तावाला उच्च न्यायालयाने मंजुरी दिली नाही. वलनी वेकोलिच्या बंद खदान परिसरातील लतिफचा रेतीसाठी सध्या महसूल विभागाच्या देखरेखीखाली आहे. कन्हान नदीवरील वलनी, रोहणा व पारडी रेतीघाटातील अवैध रेती उत्खननात लतिफ लिप्त असल्याचे तसेच हा रेतीसाठा लतिफचा असल्याचे सिद्ध करण्याच्या कामाला खापरखेडा पोलीस लागले आहे. अवैध रेती वाहतुकीतील पळून गेलेल्या १३ ट्रकची माहिती गोळा करून ते जप्त करण्याची कार्यवाही पोलिसांनी सुरू केली आहे. हा रेतीसाठा लतिफचा असल्याची माहिती महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आहे. मात्र, केवळ दहशतीपोटी महसूल विभागातील अधिकारी लतिफच्या विरोधात तक्रार दाखल करण्यास अथवा तक्रारी संशयित म्हणून त्याचे नाव नोंदविण्यास तयार नाही. महसूल विभागाने सहकार्य केल्यास पोलिसांचा अर्धा भार कमी होईल. लतिफच्या दहशतीचा सर्वाधिक त्रास महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनाच होत आहे. मात्र, तेच पुढे यायला तयार नाही.महसूल विभागाची संशयास्पद भूमिकालतिफच्या विरोधात कामठी, पारशिवनी, खापरखेडा, खापा, कोराडी व चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलीस ठाण्यांतर्गत असंख्य गुन्ह्यांची नोंद आहे. लतिफच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांना महसूल विभागाच्या सहकार्याची नितांत गरज आहे. लतिफच्या रेतीचोरीची इत्थंभूत माहिती सावनेर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आहे. यात तहसीलदार रवींद्र माने आणि त्यांचे लिपिक देवेंद्र शिदोडकर यांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. तहसीलदार माने हे येथे पदोन्नतीवर आले असून, त्यांना सावनेर तालुक्याची बारीकसारीक माहिती आहे. शिदोडकर हे सात वर्षांपासून तहसील कार्यालयात एकाच पदावर कार्यरत आहेत. लतिफ व महसूल अधिकाऱ्याच्या तथाकथित अर्थपूर्ण संबंधामुळे हे कर्मचारी पोलीस तक्रारीमध्ये लतिफच्या नावाचा उल्लेख करण्यास टाळतात. शिवाय, लतिफ हा वेळोवेळी स्थानिक नेत्यांच्या राजकीय वजनाचाही वापर करतो. प्रसंगी महसूल विभागातील अधिकारी त्यांच्याच कर्मचाऱ्यांची पाठराखण करण्यास मागेपुढे पाहतात.
लतिफला दोन दिवसांचा ‘पीसीआर’
By admin | Updated: July 2, 2014 00:56 IST