बुटीबाेरी : नगरपालिका प्रशासनाने नाेटीस देऊनही अतिक्रमणधारकांनी जागा खाली न केल्याने पालिका प्रशासनाने शेवटी पाेलीस बंदाेबस्तात राेडलगतचे अतिक्रमण जेसीबीच्या मदतीने जमीनदाेस्त केले. यात ७० दुकानांमधील दाेन ट्रॅक्टर साहित्य पालिकेने ताब्यात घेतले. ही कारवाई साेमवारी (दि. ७) करण्यात आली.
शहरातील पाेलीस स्टेशन चाैक ते कृषिदेव खत कारखाना या मुख्य मार्गालगत दुकानदारांनी माेठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने हा मार्ग अरुंद झाला हाेता. यात दुकानदारांनी त्यांच्या दुकानांसमाेर टिनांचे शेड उभारले हाेते. त्यामुळे पालिका प्रशासनाने या दुकानदारांना नाेटीस बजावून त्यांना अतिक्रमण काढण्याची सूचना करीत त्यासाठी सात दिवसाचा अवधी दिला हाेता. यात काहींनी त्यांच्या दुकानांसमाेरील शेड काढले तर काहींनी ते कायम ठेवले हाेते. त्यामुळे पालिका प्रशासनाने साेमवारी अतिक्रमण हटाव माेहीम राबवीत संपूर्ण शेड जेसीबीने जमीनदाेस्त केले.
यात ७० दुकानांसमाेरील शेड काढण्यात आले असून, ते पालिका प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये अर्धे अतिक्रमण हटविण्यात आले असून, उर्वरित अतिक्रमण लवकरच काढले जाईल, अशी माहिती पालिकेचे मुख्य अभियंता विलास बाेरकर यांनी दिली. यावेळी मुख्याधिकारी राहुल परिहार, मिलिंद पाटील, समीर गणवीर, आनंद नागपुरे, सुभाष श्रीपादवार, विशाल दुधे, विक्की ठाकरे, दुर्गेश खडतकर, मुख्तार सैयद यांच्यासह कर्मचारी उपस्थित हाेते. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.
---
पार्किंगचा अडसर
बुटीबाेरी शहरातील मुख्य मार्गाच्या रुंदीकरणासाेबतच सिमेंटीकरण करण्यात आले आहे. या मार्गालगत काही ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले तर काही भागात अवैध पार्किंग तयार केले आहे. त्यामुळे नागरिकांना रहदारीस त्रास हाेत असून, वाहतुकीच्या काेंडीमुळे किरकाेळ अपघातही हाेतात. काही प्रमाणात अतिक्रमण काढण्यात आल्याने मार्ग माेकळा झाला आहे. अतिक्रमण हटविण्याबाबत नागरिक पालिका प्रशासनाकडे तक्रारी करीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून, आणखी काही दुकानदारांना त्यांच्या दुकानांसमाेरील अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात नाेटिसा बजावल्या असल्याचेही पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.