लोकमत सखी मंच आणि हार्मोनीतर्फे संस्थेचे आयोजन नागपूर : प्रसिद्ध गायक किशोरकुमार यांची मुले अमित व सुमितकुमार एकत्रितपणे पहिल्यांदाच नागपुरात लाईव्ह शो करणार आहेत. हा कार्यक्रम लोकमत संखी मंच आणि हार्मोनीतर्फे संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे शीर्षक ‘किशोर के कुमार’ आहे. ही अनोखी मैफिल येत्या १० आॅगस्ट रोजी देशपांडे सभागृहात दुपारी १.३० वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती हार्मोनीचे संचालक राजेश समर्थ यांनी दिली. अमित आणि सुमित यांच्या स्वरात किशोरकुमार यांची झलक जाणवते. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघेही वडिलांच्या स्वरांची साधना करीत आहेत. नागपुरात त्यांचा हा पहिलाच लाईव्ह शो असेल. राजेश समर्थ यांच्या संकल्पनेतून ही मैफिल सादर करण्यात येणार असून, नागपूरकर रसिकांना यानिमित्ताने किशोरकुमार यांच्या आठवणी ऐकण्याची आणि त्यांच्या गीतांचा आनंद घेण्याची संधी लाभणार आहे. सुमितकुमार यांचाही आवाज आणि गायकी किशोरकुमार यांच्यासारखीच आहे. त्यामुळे या दोन्ही गायकांकडून किशोरदांची गीते ऐकण्याची पर्वणी नागपूरकरांना मिळणार आहे. अमितकुमार सध्या ६२ वर्षांचे असून त्यांना गळ्याचा आजार असल्याने कदाचित यानंतर ते जाहीर मैफिलीत गायन करणार नाहीत. नागपुरातील ही मैफिल कदाचित त्यांची अखेरची मैफिल ठरण्याची शक्यता असल्याची माहिती राजेश समर्थ यांनी यावेळी दिली. अमितकुमार किशोरदांसह नेहमीच रेकॉर्डिंगला जायचे. त्यामुळे त्यांच्याकडे किशोरकुमार यांच्या आठवणींचा खजिनाच आहे. हा खजिना रसिकांना कार्यक्रमातून मिळणार आहे. अनेक गीतांमध्ये ते किशोरकुमार यांची वेशभूषा करून त्यांच्यासारखा अभिनयही सादर करतात. यामुळे रसिकांना अधिक मजा येते. अमितकुमार यांची बहीण चंद्रा संन्याल या नागपुरातच राहतात. याच दिवशी राखी असल्याने त्यांनाही या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले असून, किशोरदांचे राखीचे गीत अमितकुमार सादर करणार आहे. यात वाद्यवृंदावर राजा राठोड, पवन मानवटकर, प्रकाश चव्हाण, रिंकू निखारे, अरविंद उपाध्याय, प्रशांत खंडाळे, नंदू गोहाणे, प्रशांत नागमोते, सागर मधुमटके, बालू यादव, राजू गजभिये आणि उज्ज्वला गोकर्ण साथसंगत करतील. तर आकांक्षा नगरकर, श्रुती चौधरी, सृष्टी बार्लेवार त्यांना गायनात साथ देतील. या कार्यक्रमाच्या निशुल्क प्रवेशिका संपल्या आहेत. तिकिट विक्री सभागृहासमोर उपलब्ध आहे. लोकमत सखी मंचच्या सदस्यांना २० टक्के सवलतील हा पासेस मिळतील. कार्यक्रमाला राहुल डेव्हलपर्स आणि बँक आॅफ इंडिया यांचे सहकार्य लाभले आहे. (प्रतिनिधी)
‘किशोर के कुमार’ १० ला
By admin | Updated: August 8, 2014 01:10 IST