लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि. ८) रात्री काटाेल-मूर्ती मार्गावर कारवाई करीत विदेशी दारूची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले हाेते. यात त्यांनी ११ लाख ४१ हजार २०० रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला. या कारवाईनंतरही तालुक्याची दारूची अवैध वाहतूक सुरूच राहिली. त्यातच काटाेल पाेलिसांनी काटाेल-नागपूर मार्गावरील चारगाव शिवारात कारवाई करीत दारूची अवैध वाहतूक करणारी स्काॅर्पिओ पकडली. यात चालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून दारू व वाहन असा एकूण ५ लाख २८ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
बुद्धभूषण भाऊराव बागडे (२४, रा. चारगाव, ता. काटाेल) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. काटाेल पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना काटाेल शहरातून नागपूरच्या दिशेने दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे या पथकाने चारगाव येथील बसस्टाॅपजवळ नाकाबंदी करून एमएच-४०/ए-७६६५ क्रमांकाची स्काॅर्पिओ थांबवून झडती घेतली. त्यात देशीदारूच्या १० पेट्या आढळून येताच कागदपत्रांची तपासणी केली. ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी वाहनचालक बुद्धभूषण यास अटक केली आणि त्याच्याकडून वाहनासह दारू जप्त केली.
या कारवाईमध्ये पाच लाख रुपयाची स्काॅर्पिओ आणि २८ हजार ८०० रुपये किमतीच्या देशीदारूच्या १० पेट्यांमधील ४८० बाटल्या असा एकूण ५ लाख २८ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार महादेव आचरेकर यांनी दिली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कामगिरी पाेलीस उपनिरीक्षक पूनम काेरडे, काकडे, राजिक शेख, मेश्राम, महाजन यांच्या पथकाने केली.