‘एक शाम दोस्ती के नाम’ संगीतमय कार्यक्रम : मैत्री परिवार संस्थेचा कार्यक्रम नागपूर : संस्थेचे नावच मैत्री परिवार...सगळेच मित्र एकत्रित आलेले...आयोजक फेटे घालून निमंत्रित मित्रांचे स्वागत करण्यात व्यस्त...हस्तांदोलन, जुन्या आठवणींच्या गप्पा, एकमेकांची विचारपूस आणि गीतांचा कार्यक्रम ‘एक शाम दोस्ती के नाम’. दोस्ती, यारी, मैत्र आणि या मैत्रीच्या अनुषंगाने येणारे जीवनाचे तत्त्वज्ञान, आनंद, दु:ख, वेदना आणि विरह मांडणाऱ्या भावनांच्या विविध छटांची दर्जेदार गीते. हे सारेच चपखल जुळून आले असताना पुरेसे वाटते. पण आजचा कार्यक्रम एक वेगळी उंची गाठणारा होता. दर्जेदार आशयाची गीते, ऐकणारे दर्दी जाणकार रसिक आणि सादर करणारे वादक - गायक तयारीचे होते. दाद किती वेळा द्यावी, कुठे-कुठे द्यावी असा प्रश्न पडावा, असा समां आज बांधला गेला. साई सभागृहात झालेल्या या कार्यक्रमातील प्रत्येक गीताला वन्समोअर देताना अखेर प्रेक्षकांनाच संकोच बाळगावा लागला कारण अख्खा कार्यक्रमच वन्समोअर द्यावा, असाच होता. मैत्री परिवार संस्थेच्यावतीने संस्थेला सातत्याने सहकार्य करणाऱ्या आणि समाजातील वेदना दूर करण्यासाठी मैत्री परिवार संस्थेच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या असलेल्या मित्रांसाठी हा कार्यक्रम खास आयोजित करण्यात आला होता. मनमोकळी दाद, वन्समोअर, सुरेल गीतांची मैफिल आणि कधी मदन मोहन तर कधी पंचमदा यांच्या संगीताच्या हिंदोळ्यावर झुलत हा कार्यक्रम भावनांना हात घालत राहिला. जगणे आतापर्यंत कुणाच्याच हाती लागले नाही, सापडले असे वाटत असतानाच जगणे पुन्हा निसटते, पुन्हा हा शोध सुरू राहतो कारण मानवी इच्छांचा अंत नसतो. सकारात्मक दृष्टीने केलेल्या या विचारांवर माणसाला बरेच काही करायचे राहून जाते, त्याची हूरहूर मनात कायम असते. मित्रांच्या सहकार्याने मात्र एखादे मोठे कामही सहजपणे होते. मैत्रीच्या याच भावनेला सलाम करताना अनेक भावनांच्या गीतांनी नेमकेपणाने जगणे चिमटीत पकडण्याचा हा आनंददायी प्रयत्न होता. श्वेता शेलगावकर यांचे अभ्यासपूर्ण संवाद साधणारे निवेदन आणि प्रामुख्याने सागर मधुमटके आणि सुरभी ढोमणे यांचे तयारीचे सादरीकरण यामुळे रसिक ‘नॉस्टॅल्जिक’ होणार नाही तर नवलच. मस्तपैकी मनमोकळी दाद देत रसिकांनीही हा कार्यक्रम ‘एन्जॉय’ केला. कार्यक्रमाचा प्रारंभ सुरभीने सत्यम श्विम सुंदरम या गीताने केला. त्यानंतर सागरने ‘झुम झुम झुमझुम झुमरू...’ हे गीत सादर केले आणि या गीतावर रसिकही थिरकले. या कार्यक्रमातील सर्वच गीतांची निवड फार चोखंदळपणे करण्यात आली होती त्यामुळे रसिकांची विशेष दाद मिळाली. साधारणत: इतर कार्यक्रमात फारशी न गायली जाणारी गीते एकत्र ऐकण्याचा आनंद त्यामुळे रसिकांना घेता आला. यानंतर सागरने ‘बेकरारे दिल..., कोई हमदम..., आके सिधी लगी.., दिये जलते है..., ये क्या हुआ..., घुंगरू की तरह..., डाकिया डाक लाया, ये जीवन है, अगर तुम ना होते, ये जो मोहब्बत है..’ आदी गीतांनी त्याने रंगत आणली. गझल, सुगम, उपशास्त्रीय गीतांच्या मैफलित सुरभीच्या काही गीतांनी रसिकांना दाद द्यायला भाग पाडले. सुरभीने ‘हरसात मे..., मुझे किसीसे प्यार हो गया, बैयां ना धरो, रस्मे उल्फत को निभाए तो निभाए कैसे, सोला बरस की बाली उमर को, सजना है मुझे, बेचारा दिल क्या करे, यारा सिली सिली.., मोरनी बागा मे...’ अशा जीव घेणाऱ्या गीतांनी तिने घायाळ केले. उत्कृष्ट वाद्यवृंद, स्वरांचे परफेक्शन आणि दर्जेदार गीतांनी हा कार्यक्रम रंगला. याप्रसंगी सुरभी आणि सागरने ‘तुम आ गये हो, सारा प्यार तुम्हारा, रैना बिती जाए, मेरे नैना सावन भादो, दो पंछी दो तिनके...’ आदी गीते सादर केली. अकोल्याच्या प्रज्योत देशमूख यांनी ‘कौन आया मेरे मन के द्वारे आणि नाचे मन मोरा...’ या दोन उपशास्त्रीय गीतांनी रसिकांची दाद घेतली. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. गिरीश गांधी, डॉ. गंगाधर दंदे यांच्या हस्ते करण्यात आले. शेफ विष्णू मनोहर यांनी अतिथींचे स्वागत केले. (प्रतिनिधी)
जान भी मांगे यार तो - दे देना, नाराज ना करना...
By admin | Updated: September 22, 2014 00:51 IST